'तपोवन'चा अमृतमहोत्सव : पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन यांची १३० वी जयंती










'तपोवन'चा अमृतमहोत्सव : पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन यांची १३० वी जयंती

दाजीसाहेबांचे मानवसेवेचे व्रत समर्थपणे व एकजुटीने पुढे नेऊया

-         न्यायमूर्ती भूषण गवई

 

            अमरावती, दि. १२ : मानवसेवा हाच धर्म मानून पद्मश्री शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांनी कार्य केले. त्यांचा वारसा तपोवन येथील संस्था समर्थपणे सांभाळत आहे. आपण सर्व अमरावतीकर मिळून मानवसेवेचे हे व्रत एकजुटीने नेऊया, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज येथे केले.   

विदर्भ महारोगी सेवा मंडळातर्फे तपोवन येथे संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांची १३० वी जयंती व संस्थेचा अमृत महोत्सवी सोहळा तेथील शिवउद्यान परिसरात झाला. त्याला प्रमुख अतिथी म्हणून न्यायमूर्ती श्री. गवई उपस्थित होते. तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी अध्यक्षस्थानी होते. माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई, जोग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश सावदेकर, श्री अंबादेवी संस्थानच्या अध्यक्ष श्रीमती विद्याताई देशपांडे, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षाताई देशमुख, तपोवन संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई,  ज्येष्ठ पत्रकार विलास मराठे, प्रभारी सचिव सहदेव गोळे, सदस्य भगवंतसिह दलावरी, झुबीन दोटीवाल, डॉ. प्रतिक राठी, विवेक अरूण मराठे, समाजसेवक डॉ. गोविंद कासट, विद्याताई देसाई आदी उपस्थित होते. 

 
          न्यायमूर्ती श्री. गवई म्हणाले की, दाजीसाहेबांनी आपल्या कार्यातून प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे मानवसेवेचे हे व्रत पुढे नेण्यासाठी समाजाने, युवकांनी योगदान दिले पाहिजे. ज्यांना समाजाने नाकारले त्या कुष्ठबांधवांच्या सक्षमीकरणासाठी तपोवनची स्थापना करून थिट्या हातांना स्वावलंबी होण्याचा मूलमंत्र दाजीसाहेबांनी दिला. माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्याशी दाजीसाहेब यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. दाजीसाहेबांची प्रतिमा अजूनही मनात ताजी आहे. कुष्ठबांधवांचा प्रश्न सोडविण्यासाठी कायदा निर्माण व्हावा, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यानुसार शासनाने गवई समिती स्थापन केली. दाजीसाहेबांच्या मानवसेवेच्या
 कार्याचे मोल जाणून दादासाहेबांनी सतत सहकार्य केले. या समितीच्या अहवालाधारे कुष्ठबांधवांना न्याय मिळाला.

तपोवनातील लसीकरण पूर्ण

कोविडकाळात तपोवनात केलेल्या उपाययोजनांची माहिती श्री. आळशी यांनी दिली. ते म्हणाले की, कोविडकाळात दक्षता व उपाययोजनांमुळे तपोवनात कुठलीही हानी झाली नाही. येथील लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. संस्थेतर्फे दिव्यांग विद्यापीठ व इतर उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

प्रारंभी न्यायमुर्ती श्री. गवई यांनी दाजीसाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करत अभिवादन केले. तपोवन संस्थेचे सदस्य विवेक मराठे यांनी सादर केलेल्या संस्थेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन न्यायमूर्तींच्या हस्ते झाले. तपोवन संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त मुख्याध्याक अब्दुल रशीद यांनी ओघवत्या भाषेत सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

00000

  

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती