जिल्हाधिका-यांकडून चिखलद-यात लसीकरणाचा आढावा

 


जिल्हाधिका-यांकडून चिखलद-यात लसीकरणाचा आढावा

मेळघाटात संपूर्ण लसीकरणासाठी काटेकोर नियोजन करावे

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. २९ : मेळघाटात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रभावी जनजागृती व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज चिखलदरा येथे दिले. 

मेळघाटातील लसीकरणाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार माया माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले आदी उपस्थित होते. 100 शेततळे योजनेचा शुभारंभही यावेळी जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत झाला.

महान ट्रस्टतर्फे लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. त्याची व लसीकरण केंद्रांची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. तहसील कार्यालय व नगरपरिषद कार्यालयालाही भेट देऊन त्यांनी कामाची माहिती घेतली.

लसीकरणाबाबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, लसीकरणाचे काम अधिक काटेकोर व निर्दोष नियोजनातून पूर्ण झाले आहे. लसीकरण पथकांनी गावात सकाळी लवकर पोहोचणे आवश्यक आहे. नंतर शेतकरी बांधव शेतांकडे निघून जातात. टेंभूरसोडा येथे पथक उशिरा पोहोचल्याचे आढळले. त्यामुळे गावात अधिकाधिक लोक उपलब्ध असण्याची वेळ लक्षात घेऊन लसीकरणाची वेळ निश्चित करावी. ती एकतर सकाळी नऊ ते दुपारी दोन असावी किंवा सायंकाळी चार ते आठ असावी. अनेक पाड्यांमध्ये अजूनही जनजागृती आवश्यक आहे. पथकांनी स्थानिकांचे स्थलांतर आदी बाबी लक्षात घेऊन त्याबरहूकुम नियोजन केले पाहिजे व अधिकाधिक लसीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 

दुस-या मात्रेच्या लाभार्थ्यांच्या याद्या ‘एमओंकडे असाव्यात

 

दुस-या डोसबाबतही गांभीर्याने कार्यवाही व्हावी. दुस-या डोसला पात्र व्यक्तींच्या याद्या संबंधित वैद्यकीय अधिका-यांकडे असल्या पाहिजेत. त्या पाहून संबंधितांना डोसबाबत सूचित केले पाहिजे. पहिल्या व दुस-या मात्रेतील अंतराबाबत जो कालावधी निश्चित करून दिला आहे, त्याचे पालन झाले पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

 

                                             ०००

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती