कर्तव्यपूर्ती यात्रेतून नागरिकांच्या प्रलंबित समस्यांचे तत्काळ निवारण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व आमदार राजकुमार पटेल यांच्या पुढाकाराने मेळघाटात उपक्रम

 




कर्तव्यपूर्ती यात्रेतून नागरिकांच्या प्रलंबित समस्यांचे तत्काळ निवारण

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व आमदार राजकुमार पटेल यांच्या पुढाकाराने मेळघाटात उपक्रम

 

अमरावती, दि. 12 : जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून गेल्या 15 वर्षांपासून राहुटीच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्यांचे निवारण केले जात आहे. त्याच धर्तीवर आता मेळघाटातही राज्यमंत्री श्री. कडू व आमदार राजकुमार पटेल यांच्या पुढाकाराने ‘कर्तव्यपूर्ती यात्रा’ या अनोख्या उपक्रमाद्वारे विविध विभागांना एकत्र आणून हजारो नागरिकांच्या विविध समस्या, अडीअडचणींचे निवारण करण्यात आले.

कोरोनाकाळात विविध नागरिकांची, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची अनेक कामे रखडली. परिणामी गेल्या दीड वर्षांपासून नागरिकांची अनेक कामे प्रलंबित राहिली होती. हे लक्षात घेऊन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व आमदार राजकुमार पटेल यांच्या पुढाकाराने मेळघाटात हा उपक्रम राबविण्यात आला. चिखलदरा तालुक्यातील टेंब्रुसोंडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी हा लोकाभिमुख उपक्रम हाती घेण्यात आला, असे राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी सांगितले.

                                    अडचणींचा जागेवरच निपटारा

सर्व शासकीय विभागांचे कक्ष कर्तव्यपूर्ती यात्रेत समाविष्ट होते. सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सहभागी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश राज्यमंत्री व आमदार महोदयांनी दिले. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचा जागेवरच निपटारा झाला.  संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय अर्थसाह्य योजना, श्रावण बाळ योजना या योजनांसह शिधापत्रिका आदी सुविधांसाठीच्या अर्जांचा यात्रेच्या माध्यमातून निपटारा झाला.

                                    हजारो नागरिकांना दिलासा        

उपक्रमातून ‘मिशन मोड’वर कामे केल्याने ती यशस्वी होतात. अनेकदा गरीब, सर्वसामान्य नागरिकांना योजनांची माहिती नसते. अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. मात्र, त्यांची कामे वेळेत होत नाहीत. हे लक्षात घेऊन एकाच ठिकाणी सर्व विभागांच्या उपस्थितीत लोकांच्या अडचणी जाणून तत्काळ निर्णयप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळून त्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया श्री. कडू यांनी व्यक्त केली.

                     अर्ज लिहिण्यापासून सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध

नागरिकांना अर्ज लिहायला मदत करण्यापासून झेरॉक्स, फॉर्म, सेतू कक्ष व इतर सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी असे वेगवेगळे अधिकारी- कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने प्रत्येक ठिकाणी सही-शिक्क्यासाठी स्वतंत्रपणे जाण्याची गरज भासत नाही. या सुलभ प्रक्रियेमुळे नागरिकांची कामे होऊन त्यांना दिलासा मिळतो. आपण ‘नायक’ हा चित्रपट पाहिला होता. तो पाहून मला अशा शिबिराची कल्पना सुचली. पंधरा वर्षांपूर्वी मी हा उपक्रम सुरू केला. आता मेळघाटातही हा उपक्रम सुरु केला आहे. अभियानात मोठी ताकद असते. त्यामुळे पारदर्शकता निर्माण होऊन गैरव्यवहार रोखायला मदत होते, असेही श्री. कडू यांनी सांगितले.

मेळघाटात प्रथमत:च हा कार्यक्रम घेतला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मेळघाटात ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले. मेळघाटातील दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला आहे, अशी प्रक्रिया आमदार श्री. पटेल यांनी व्यक्त केली.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती