कोविड प्रतिबंधक लसीकरण उद्दिष्टपूर्तीमध्ये तिवसा तालुका अव्वल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

 





 कोविड प्रतिबंधक लसीकरण उद्दिष्टपूर्तीमध्ये तिवसा तालुका अव्वल

 जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

 भातकुलीचा दुसरा तर धामणगाव रेल्वेचा तिसरा क्रमांक

अमरावती, दि. 30 : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी 11 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सर्वाधिक लसीकरण केलेल्या तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचा जिल्हाधिकारी पवनीत कौर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या मात्रेची 94.90 टक्के लसीकरण केल्यामुळे जिल्ह्यामध्ये तिवसा तालुक्याचा प्रथम क्रमांक आला आहे. तर भातकुली येथे 87.73 टक्के लसीकरण केल्यामुळे दुसरा क्रमांक आला असून धामणगाव रेल्वे येथे 87.1 टक्के लसीकरण पूर्ण केल्यामुळे तृतीय क्रमांक आला आहे. येथील तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना यावेळी प्रशस्तीपत्र तसेच धनादेश देऊन गौरविण्यात आले.

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या डोसची उद्दिष्टपूर्ती केल्यामुळे तिवस्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जोत्स्ना पोटपिटे-देशमुख यांना 20 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र, भातकुलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अक्षय निकोसे यांना यांना 15 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र तर धामणगाव रेल्वेचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांना 10 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डी व बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात 100 टक्के आणि कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात 98.5 टक्के कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. उदिष्टपूर्तीच्या अग्रक्रमानुसार, मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सुमित गजभिये यांना 30 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र, बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अमित देशमुख यांना 25 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र, कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश गारोडे यांना 20 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोरोना संसर्गजन्य रोगाचे संकट टाळण्यासाठी प्रशासन तसेच आरोग्य विभागामार्फत लसीकरण व्यापक प्रमाणावर व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.  याचीच परिणती म्हणून या तालुक्यांमध्ये लसीकरणाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य झाले आहे. याबाबत श्रीमती पवनीत कौर यांनी समाधान व्यक्त केले. इतर तालुक्यांमध्येही याच धर्तीवर व्यापक प्रमाणावर लसीकरण मोहिम राबविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

31 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस राहिलेल्या 1 लाख 17 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी व्यापक मोहिम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत लसीकरण करुन घेणाऱ्या नागरिकांमधून 10 लकी ड्रॉ काढून त्यांना ‘किचन मिक्सर’ बक्षीस म्हणून देणार असल्याचे श्रीमती पवनीत कौर यांनी यावेळी जाहीर केले.

3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षे वयोगटासाठी कोरोना लसीकरण मोहिम सुरु करण्यात येणार आहे. यासाठी 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांसाठी 1 जानेवारी 2022 पासून ऑनलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध होईल. लाभार्थ्यांनी यावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल, वरुडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पवन धाकडे आदी यावेळी उपस्थित होते.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती