जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील दीड लाख मुलांचे होणार लसीकरण नोंदणी शनिवारपासून, लसीकरण 3 जानेवारीपासून - जिल्हाधिकारी पवनीत कौर


 

जिल्हाधिका-यांनी घेतला लसीकरणाचा आढावा

जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील दीड लाख मुलांचे होणार लसीकरण

नोंदणी शनिवारपासून, लसीकरण 3 जानेवारीपासून

 

-          जिल्हाधिकारी पवनीत कौर

अमरावती, दि. 30 : शासनाच्या निर्देशानुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण, तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, 60 वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. त्यानुसार कुमारवयीन वयोगटातील अमरावती जिल्ह्यात 1 लाख 49 हजार 956 आणि 60 वर्षांवरील व सहव्याधी असलेल्या 71 हजार 963 व्यक्तींचे लसीकरण दि. 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. कुमार वयोगटासाठीची कोविन ॲपद्वारे नोंदणी 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. याबाबत जिल्ह्यातील ग्रामीण भागात व महापालिका क्षेत्रात परिपूर्ण नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.

 

            जिल्हाधिका-यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरणाचा आढावा घेतला, तसेच नव्याने करावयाच्या लसीकरणाचे परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश दिले. आरोग्य विभागासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड- 19 लसीकरण, तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार नोंदणी व लसीकरण सुरु करण्यात येत आहे. कुमार वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लसच देण्याचा आदेश असल्याने ती लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. 15 ते 18 वयोगटाच्या लसीकरणासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने नियोजन होत असल्याचे डॉ. रणमले यांनी सांगितले.

                                फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण 10 जानेवारीपासून

हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही मात्रा घेतल्या असतील तर त्यांना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. अशा व्यक्तीने दुसरी मात्रा घेतल्यानंतर नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

ज्येष्ठ व्यक्तींना प्रमाणपत्राची गरज नाही

60 वर्षे किंवा त्यावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना प्रिकॉशन डोस घेताना लसीकरण केंद्रावर प्रमाणपत्र दाखविण्याची गरज नाही. मात्र, त्यांनी तिस-या मात्रेचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेण्याचे आवाहन आहे.

खासगी लसीकरण पूर्वीच्याच दरात

शासकीय लसीकरण केंद्रांवर ही लस विनामूल्य असेल. ज्यांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची आहे, त्यांना केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेल्या किमतीतच लसीकरण करता येईल. त्यात कुठलाही बदल नाही.

कोविन ॲपमध्ये नोंदणीच्या सुविधा आहेत

·         हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक

हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाऊंटवरून प्रिकॉशन डोससाठी नोंदणी करता येईल. दुस-या डोसनंतर 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण होणे आवश्यक आहे. यातील व्यक्तींनी कार्यालयाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यांचे लसीकरण केवळ शासकीय केंद्रांवर होईल.

 

·         15 ते 18 वयोगटातील नवीन लाभार्थींची नोंदणी 1 जानेवारीपासून

सन 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेले लाभार्थी पात्र राहतील. लाभार्थ्यांना कोविन प्रणालीवर स्वत:च्या मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येईल. ही सुविधा 1 जानेवारीपासून सुरू होईल. नोंदणी लसीकरण केंद्रांवरही करता येईल. या वयोगटातील लाभार्थ्यांना स्वतंत्र लसीकरण केंद्रे असतील किंवा जिथे स्वतंत्र केंद्रे सुरु करणे शक्य नसेल तिथे स्वतंत्र रांगांची सोय असेल.  

०००


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती