दिव्यांग बांधवांची तपासणी व आवश्यक साहित्याचे विनामूल्य वाटप - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


 

सेवा माह’ जनजागरण अभियानातून गरजूंना आवश्यक सेवा- सुविधा

दिव्यांग बांधवांची तपासणी व आवश्यक साहित्याचे विनामूल्य वाटप

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 23 : केंद्रिय दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग व मोझरी येथील श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेतर्फे विविध तालुक्यांतील दिव्यांग बांधवांची तपासणी शिबिरे ठिकठिकाणी घेण्यात येत आहेत.  तपासणीनंतर दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.

 

आवश्यक संपूर्ण खर्च आपण स्वत: करणार : पालकमंत्री

 

दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग व श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेतर्फे लोकनेते स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त 28 जानेवारीपर्यंत संपूर्ण महिना ‘सेवा माह’ म्हणून व जनजागरण अभियान साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार ‘एडिप’ योजनेत दिव्यांग बंधूभगिनींना पहिल्या टप्प्यात तपासणी व दुस-या टप्प्यात उपकरण व आवश्यक साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. योजनेत अनुदानाव्यतिरिक्त लाभार्थ्याने भरावयाचा हिस्सा आपण स्वत: भरणार आहोत. त्यामुळे दिव्यांग बांधवांना कुठलाही खर्च लागणार नाही. गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक त्या सर्व सेवा, सुविधा मिळवून देण्याचा आमचा निर्धार आहे, असे पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

 

शिबिरांना सुरूवात; तज्ज्ञांचे पथक दाखल

 

दिव्यांगजन तपासणी शिबिरांना मंगळवारपासून (21 डिसेंबर) सुरुवात झाली असून, तपासण्यांसाठी दिल्ली येथून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दाखल झाले आहे.  मोर्शी तालुक्यात पहिले शिबिर लेहगाव येथे घेण्यात आले. त्यात 447 दिव्यांगजनांची तपासणी झाली. दिव्यांगांना लागणा-या आवश्यक उपकरणांसाठी मोजमाप घेण्यात आले. पहिल्या शिबिरातील तपासणीत 327 दिव्यांगांना उपकरणांची गरज असल्याचे आढळले. त्यांना ती विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतील. भातकुली तालुक्यात सिकची रिसॉर्ट येथे 498 दिव्यांगजनांची तपासणी झाली. तपासणीनंतर गरजू 352 दिव्यांगजनांना विनामूल्य उपकरणे दिली जातील. अमरावती तालुक्यासाठी क्षितिज मंगल कार्यालयात शिबिर झाले. तिवसा तालुक्यात मोझरी येथे बहुउद्देशीय सभागृहात शुक्रवारी तपासणी शिबिर होणार आहे.   शिबिरांत नोंदणीकृत, तसेच नोंदणी नसलेल्या दिव्यांगजनांनाही लाभ मिळवून देण्यात येत आहे.

 

गरजेनुसार उपकरणे मिळणार

 

दिव्यांग बांधवांच्या तपासणीनंतर त्यांच्या गरजेनुसार मोजमाप घेऊन आवश्यक ट्रायसिकल, कॅलिपर्स, फूट, श्रवणयंत्र, स्टिक आदी साहित्य विनामूल्य देण्यात येणार आहे. याचबरोबर, ‘सेवा माह’ उपक्रमात नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, प्रशासनविषयक विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी शिबिरे आदींचेही आयोजन करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती