Tuesday, December 21, 2021

कामांची संख्या वाढवा, खर्चाचे परिपूर्ण नियोजन सादर करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आदेश

 






जिल्हाधिका-यांकडून ‘मनरेगा’तील कामांचा आढावा

कामांची संख्या वाढवा, खर्चाचे परिपूर्ण नियोजन सादर करा

-    जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आदेश

 

अमरावती, दि. 21 : गतवर्षीच्या तुलनेत ‘मनरेगा’तील कामे व त्यावरील खर्च अद्यापही कमी दिसून येतो.  विहित मुदत लक्षात घेता अधिकाधिक कामे हाती घ्यावीत व निधी खर्ची पडेल असे परिपूर्ण नियोजन करावे. अधिक मनुष्यबळ लागणा-या कामांचाही समावेश असावा जेणेकरून रोजगारनिर्मिती वाढेल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

‘मनरेगा’तील कामांचा आढावा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महसूलभवनात घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कृषी, वने, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, रेशीम उद्योग, सामाजिक वनीकरण, जलसंधारण या सर्वच विभागांकडून कामांना गती मिळण्याची गरज जिल्हाधिका-यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की,  ज्या ज्या ठिकाणी कामांची गरज व शक्यता खूप आहेत, त्या ठिकाणी अधिकाधिक कामे हाती घ्यावीत. योजनेतून मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांत 110 कि. मी. लांबीचे रस्ते तयार करण्याचे नियोजन आहे. ते काम प्राधान्याने पूर्ण करावे. अधिकाधिक कामे होण्यासाठी 10 टक्क्यांची अट काढून टाकण्यात आली. त्यानंतर कामांची संख्या वाढणे अपेक्षित आहे. त्या प्रमाणात कामे सुरू व्हावीत. 

 ‘मनरेगा’तील कामांत अंगणवाड्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश होते. योजनेद्वारे चांगले काम करून दाखविण्याची संधी आहे. नियोजनानुसार अंगणवाड्यांची कामे चांगली व्हावीत जेणेकरून एक आदर्श मॉडेल उभे राहू शकेल. मातोश्री पांदणरस्ते योजनेचे प्रस्ताव गटविकास अधिका-यांनी तत्काळ सादर करावेत, असेही निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

अनुपस्थितांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

वेळेत माहिती सादर न करणा-या व बैठकीला अनुपस्थित राहणा-यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेशही त्यांनी दिले.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-12-2025

  अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची प्रारुप यादी प्रसिद्ध; लिंकवर मतदारांना शोधता येणार आपले नाव   अमरावती, दि. 17 (जिमाका ): भारत निवडणूक आ...