आधार जोडणी नसलेल्या खात्यांची यादी 7 जानेवारीपूर्वी प्रसिद्ध करा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
                        

अमरावती, दि. 1 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी कर्जखात्याला आधार जोडणी नसलेल्या शेतक-यांची मराठी यादी तयार करून 7 जानेवारीपूर्वी प्रसिद्ध करावी. त्यानंतर लाभार्थ्यांना बँक व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवाहन करून जोडणीची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
            महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्यासह अग्रणी बँक व विविध बँकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, कर्जमुक्ती योजनेत समाविष्ट कर्जखात्यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार असून, बँकांकडून संगणकीय संस्करण झाल्यानंतर थेट लाभार्थ्याच्या खात्यावर रक्कम जमा होईल. ही प्रक्रिया वेळेत पार पडण्यासाठी सर्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे.
योजनेची गतीने अंमलबजावणीसाठी कर्ज खातेदारांचा तपशील पडताळून ज्या कर्जखात्याला आधार जोडणी झालेली नाही अशा कर्जदारांची यादी मराठीमध्ये तयार करावी व सदर यादी बँक शाखेच्या, विकास संस्थेच्या, तसेच अधिनस्त ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करुन शेतक-यांना आधार जोडणी करण्याबाबत आवाहन करावे. ही कार्यवाही सात जानेवारीपूर्वी पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले.
            योजनेची भरीव अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने विहित मुदतीत काम व्हावे, या दृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
                                    ०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती