कौंडण्यपूर विकास आराखड्यातील कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावाविकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही- महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर


अमरावती, दि. 18 : कौंडण्यपूर विकास आराखड्यातील कामे गतीने पूर्ण करावीत. या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज कौंडण्यपूर येथे दिली.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे भेट देऊन येथील विकासकामांचा आढावा घेतला. श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थानचे अध्यक्ष ना. बा. अमाळकर, विश्वस्त अतुल ठाकरे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. ठाकूर म्हणाल्या की, आराखड्यानुसार कामांना अद्यापही गती मिळाली नाही. ही कामे गतीने पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी मिळवून देण्यात येईल. संस्थानच्या परिसरातील अडीच कि. मी. नदीघाटाचे काम पूर्णत्वास न्यावे.
पादचारी मार्गाचे बांधकाम, पर्यटक विसावा इमारत, उद्यान विकसित करणे, उपाहारगृह, व्यापार संकुल, नौकानयन व मंदिर परिसरातील विकास कामे आदी कामांचा आराखड्यात समावेश आहे. त्याशिवाय, श्री विठ्ठल रुख्मिणी पुतळ्याचे उंच मनो-याचे इमारतीचे बांधकाम करणे, प्रवेशद्वार, उद्यान परिसरात सिंचन पद्धत विकसित करणे ही कामे वेळेत होणे अपेक्षित आहेत.  ही कामे निधीअभावी रखडता कामा नयेत. या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी संस्थानचे पदाधिकारी, नागरिक यांच्याशी संवाद साधून आराखड्यातील कामांबाबत माहिती घेतली. प्रारंभी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
     जहागीरपूर येथेही भेट
जहागीरपूर येथील श्री महारूद्र मारूती संस्थानलाही पालकमंत्र्यांनी आज भेट दिली. यावेळी संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थानला ब दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करून हे काम पूर्णत्वास नेऊ, तसेच येथे विकासाच्या दृष्टीने अधिकाधिक कामे करण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही त्या म्हणाल्या.
                                                            000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती