Saturday, January 11, 2020

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणी

 
Ø  गारपीटग्रस्त भागाचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे निर्देश
 
अमरावती, दि. 11 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज जिल्ह्यातील गारपीटग्रस्त परिसराची पाहणी केली. शेतकऱ्यांना भरीव मदत होण्याच्या दृष्टीकोनातून  शेतीच्या नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई, वाघोली आदी गावांना भेट देऊन शेतीची पाहणी केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सिध्दार्थ मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी या दौऱ्यात नेरपिंगळाई येथे लक्ष्मण महादू झोडगे, प्रवीण कोहळे, अतुल चांडक, वाघोली येथील ओंकार माणिकराव चांगोले आदी शेतक-यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पीकांची पाहणी केली व शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी संत्रा बागांसह गहू, कापूस आणि हरभरा पिकांची पाहणी त्यांनी केली. गारपिटीने बाधित झालेल्या गावांची आणि पिकांच्या क्षेत्राची त्यांनी कृषी अधिकारी श्री. चवाळे यांच्याकडून माहिती घेतली.
जिल्ह्यात झालेला अवेळी पाऊस आणि जानेवारी महिन्यात पडलेल्या गारपीटीने जिल्ह्यातील कापूस, तूर आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी दोन दिवसांत नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी कृषि विभागाला दिले.
शेतकरी बांधवांच्या प्रश्नाबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.   आवश्यक मदतीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा करण्यात येईल, असे श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले. सार्सी, नेर पिंगळाई, राजुरवाडी आदी विविध गावांतील ग्रामस्थांतर्फे पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतीला पाणी पुरवठा, शेत मालाला हमीभाव, पिकांचे नुकसान झाल्यास तातडीची नुकसान भरपाई आदी बाबी आवश्यक आहेत. त्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तालुक्यातील 70 गावे पाणीपुरवठा योजनेला गती देण्यात येईल. मनरेगामध्ये होणाऱ्या विकास कामात सुसूत्रता ठेवावी. मजुरांचे व्यवस्थित हजेरीपट ठेवून वेळेत मजुरी अदा करावी, असे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले.  
  

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...