राज्यात लवकरच पोलीस भरती - गृह मंत्री अनिल देशमुख








अमरावती, दि. १३ : गृह खात्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन प्रयत्नरत असून, सात ते आठ हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती केली  जाणार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज दर्यापूर येथे सांगितले.
          लोकनेते स्व. जे. डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त  दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
      विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, जि. प. सभापती जयंतराव देशमुख, माजी मंत्री रणजीत देशमुख, माजी आमदार अमर काळे, सुनील वऱ्हाडे, आनंद माने आदी यावेळी उपस्थित होते.
गृह मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण तरुणांनी तयारी करून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. गत काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
ते पुढे म्हणाले की, अवैध सावकारी, नक्षलवाद यांना आळा घालण्यासाठी शासन महत्वाची पावले उचलणार आहे. ऑल इंडिया क्राईम रिपोर्ट नुसार विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये. स्व. बाबासाहेब सांगळूदकर यांनी  दर्यापूर परिसरात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सर्वांनी समाजाचा विकास घडवून आणावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,  बालमजुरी रोखण्यासाठी व बालकांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी भरीव कार्यक्रम राबविण्यात येईल. बालके ही उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सकारात्मक निर्मितीकडे वळविण्याची सर्वांची जबाबदारी आहे. 
आमदार श्री. वानखडे, श्री. तसरे, श्री. काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कांचनमाला गावंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी मंत्री महोदयांनी स्व. सांगळूदकर यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती