पालकमंत्र्यांकडून विविध विभागांचा आढावाविहीत मुदतीत कामे पूर्ण करा - पालकमंत्री यशोमती ठाकूर


          अमरावती, दि. 19 : प्रत्येक कामाचे काटेकोर नियोजन करुन ते विहीत मुदतीत पूर्ण करावीत. कुठल्याही कामातील विलंब खपवून घेणार नाही, असे निर्देश महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

          विविध विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा पालकमंत्र्यांनी आज नियोजनभवनात बैठकीत घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, महापालिका आयुक्त संजय निपाणे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

          श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कामांचे काटेकोर नियोजन करुन ती पूर्ण केली पाहिजेत. पाणलोट व्यवस्थापन, पांदणरस्ते ही कामे पावसाळा संपला की इतर काळात केली जातात. त्यामूळे कालावधी लक्षात घेऊन त्यांचे नियोजन व्हावे. कुठल्याही कामांचा अनुशेष राहता कामा नये. टंचाईच्या प्रसंगी छावण्यांची गरज असते. तथापि, जिल्ह्यात यापूर्वी टंचाईच्या काळात छावण्या लावल्या गेल्या नाहीत. यापुढे असे होता कामा नये. टंचाईच्या काळात गरज असेल तिथे छावण्यासाठी प्रस्ताव गेले पाहिजेत.

          त्या म्हणाल्या की, पाणी पुरवठ्याच्या योजनांची योग्य अंमलबजावणी व्हावी. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या योजनेत आत्मा व पोकरातील कामांची सांगड घालून स्वयंरोजगाराला चालना द्यावी. शेतकरी बांधवांना कर्ज वितरणास गती द्यावी. कर्जमुक्ती योजनेत आधार लिंकींगचे काम तत्काळ पूर्ण करावे. शाळा, अंगणवाड्या, दवाखाने यांच्या इमारतींची कामे विहीत वेळेत पूर्ण व्हावीत. काही पंचायत समितींच्या इमारतीही नव्याने बांधण्याची गरज आहे. त्याबाबत प्रस्ताव द्यावा. आवश्यक सर्व कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

          त्या पुढे म्हणाल्या की, वृक्षारोपणासाठी  बिहार पॅटर्नसारखी परफॉर्मन्स बेस्ड योजना राबविता येते किंवा कसे यादृष्टीने नियोजन करावे. मनरेगातून वृक्षारोपणाची कामे हाती घ्यावी. जिल्ह्यातील महत्वांच्या रस्त्यांवर दुतर्फा झाडे लावून हिरवाई निर्माण करणे गरजेचे आहे. जहागीरपूर येथील तिर्थक्षेत्राला ब दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. त्याचप्रमाणे जिल्ह्यात एकही तिर्थक्षेत्राला अ दर्जा प्राप्त नाही. तथापि, श्री अंबादेवी संस्थान, श्री गुरुकुंज मोझरी येथे भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या श्री क्षेत्रांना अ दर्जा मिळण्याबाबत प्रस्ताव द्यावा. शिक्षक प्रशिक्षणात मेडीटेशनचाही अंतर्भाव असला पाहिजे. शहरातील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने नियोजन अंमलबजावणी करावी. रोही या वन्य प्राण्यामुळे शेतीचे नुकसान होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामूळे ते रोखण्यासाठी कार्यवाही व्हावी. तसेच अपघात झाल्यास सहाय्य योजनेत समावेशाबाबत प्रस्ताव पाठवावा. जिल्हा ग्रंथालयाने ई-लायब्ररी सुरु करण्याबाबत पावले उचलावीत. कुऱ्हा, वलगाव येथे ग्रामीण रुग्णालय व कौंडण्यपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याबाबत प्रस्ताव द्यावा.

          हायब्रीड ऍनुईटीमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यात साडेसात मीटर रस्ता बांधकामासह शोल्डर व फॉर्मेशन या अडीच मीटरच्या कामाला वन विभागाच्या परवानगी आदी प्रक्रियेच्या अडचणी येत आहेत. त्यामुळे यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करुन कामांना गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

          जिल्ह्यातील 70 गाव पाणी पुरवठा योजना, छत्री तलाव सौंदर्यीकरण, दुग्ध विकास योजना, क्रीडा संकुल, आयटीआय, उद्योग आदी विविध कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.     

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती