पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा सत्कार पत्रकारांना घरकुल मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत - पालकमंत्री यशोमती ठाकूर







अमरावती, दि. 25 : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे.  समाजातील प्रश्न राज्यकर्त्यासमोर मांडून त्याच्या निराकरणासाठी पत्रकार सतत धडपडत असतो. त्यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी जिल्ह्यातील नियोजित भूखंडावर घरकुल निर्मितीसाठी शासनाव्दारे सर्वतोपरी मदत करू, असे जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.
अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांचा सन्मानचिन्ह,  शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे, दिलीप एडतकर, नानक आहुजा, शशिकांत ओहळे व संघाचे गोपाल हरणे, गिरीष शेरेकर यांच्यासह इतर पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पत्रकारांना हक्काचे घर असावे, त्यांच्यासाठी वैद्यकीय विमा योजना यासारख्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करू. सोलापूर येथे निर्माण होत असलेल्या घरकुल प्रकल्पाच्या धर्तीवर अमरावती येथे सुध्दा म्हाडा मार्फत घरकुल बांधकामाच्या प्रस्तावाला पालकमंत्री या नात्याने सर्वकष मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, बसस्थानक, तहसील कार्यालय, न्यायालय यासारख्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या इमारतींचे वैभव कायम ठेवून सुशोभीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार भवनासाठी निवासाच्या सोयीसह अद्ययावत इमारत व पत्रकारांसाठी आरोग्य विमा योजनासह तीन महिन्यातून एकदा संपूर्ण चेकअप सारखी योजना राबविण्यात येणार असल्याचे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. 
 उपस्थित पत्रकारांशी यावेळी त्यांनी मनमोकळा संवाद साधला.  
ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे, दिलीप एडतकर व पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांनी मनोगत व्यक्त  केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन गिरीष शेरेकर यांनी तर कृष्णा लोखंडे यांनी सर्वांचे आभार मानले. अमरावती शहरातील सर्व मुद्रित व दृकश्राव्य माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार मंडळी यावेळी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती