Saturday, January 25, 2020

अधिक विकासकामांसाठी भरीव निधी मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न - पालकमंत्री यशोमती ठाकूर

नियोजन समितीची बैठक

                        




·        विविध नाविन्यपूर्ण कामांचा अंतर्भाव

अमरावती, दि. 25 : ग्रामीण व शहरी भागातील विकासकामांसह विविध नाविन्यपूर्ण कामांचा अंतर्भाव जिल्हा नियोजनात करण्यात येईल. अधिकाधिक विकासकामे व्हावीत यासाठी निधी वाढवून मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करू. प्रशासनानेही गतिमान होत कामे राबवावीत, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली येथील नियोजनभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, महापौर चेतन गावंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार रवी राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार देवेंद्र भुयार, आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त संजय निपाने आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेत सन 2020-21 साठी 219 कोटी 18 लाख रूपये नियतव्यय असून, अधिक विकासकामे व अपेक्षित अतिरिक्त निधी मागणीबाबत चर्चा या बैठकीत झाली.   

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे झाली पाहिजेत. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अंतर्भाव नियोजनात करण्यात येईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी साडेदहा वाजता लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विकास कामांविषयी बैठक घेण्यात येईल. 
 त्या पुढे म्हणाल्या की,  विकासकामांचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाकडूनही गती मिळणे गरजेचे आहे. कामातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्राप्त निधी वेळेत खर्च झाला पाहिजे. फास्ट फॉरवर्ड होत कामे करावीत. ग्रामपंचायत व इतर महत्वाच्या कार्यालयांच्या जुन्या व शिकस्त इमारती असतील, तिथे नवीन इमारती व गावोगाव अभ्यासिका उभारण्यासाठी निधी देण्यात येईल. ७० गावे पाणीपुरवठा योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाशी सांगड घालण्याबाबत  प्रयत्न करण्यात येईल. तूर खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करावीत.  शाळा आणि अंगणवाड्यांच्या इमारतींची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील.

 महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेची गतीने अंमलबजावणी करावी. अतिवृष्टी व अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. क वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पाठपुरावा करण्यात यावा. तिवसा येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाचे काम तात्काळ सुरू करावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम लवकर मार्गी लागण्यासाठी कॅबिनेट मध्ये पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी स्त्री- पुरुष समानतेसाठी व लिंगभेद विषमता निर्मूलनासाठी योगदान देण्याची शपथ सर्वांनी घेतली. 
महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेची माहिती देणारी चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...