Sunday, January 26, 2020

जिल्ह्यात शिवभोजन योजनेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


अमरावती, दि. 26 : जिल्ह्यातील शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी उपाहारगृह येथे झाला.
बाजार समितीसह अमरावती बसस्थानक येथील एस. टी. उपाहारगृह, डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल हॉस्पिटल येथेही शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ झाला. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक दहिकर, संचालक प्रफुल्ल राऊत, प्रकाश कोकाटे, प्रवीण बिचकुले, उमेश गोरडे, मिलिंद तायडे, प्रवीण भुगुल, सचिव दीपक विजयकर, धीरज कोकाटे, राजेंद्रकुमार भटकर आदी यावेळी उपस्थित होते.
योजनेचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पहिली थाळी लाभार्थ्याला दिली. वरण, भात, चपात्या, भाजी आदी विविध पदार्थांचा समावेश असलेल्या या थाळीचा आस्वाद आज अनेक लाभार्थ्यांनी घेतला. पालकमंत्र्यांनी यावेळी उपाहारगृहाची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवादही साधला.
शिवभोजन थाळी या महत्वाकांक्षी योजनेचा आजपासून संपूर्ण राज्यात प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्यात 50 ठिकाणी प्रारंभ होत आहे. राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना अल्प दरात म्हणजे केवळ दहा रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्‍ध्‍ करुन देणारी ही योजना आहे. गोरगरीबांना पोटभर व दर्जेदार जेवण मिळावे हा योजनेचा हेतू आहे. छत्रपती शिवरायांच्या कल्याणकारी राज्याची संकल्पना त्यामागे आहे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
शिवभोजन थाळी योजनेचा हा पहिला टप्पा आहे. अमरावती जिल्ह्यासाठी 500 थाळ्यांचे उद्दिष्ट आहे. भोजनालयात स्वच्छता व शुद्ध अन्नपदार्थ देण्याची भोजनालय चालकाची जबाबदारी असेल. राज्यातील गरीब व गरजू व्यक्तिना केवळ दहा रुपयांत स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन मिळणार असल्याने ही योजना गरीब आणि गरजूंसाठी वरदान ठरणार आहे, असे श्री. नवाल यांनी सांगितले.
एस. टी. उपाहारगृह, डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल हॉस्पिटल येथेही अनेक लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...