Monday, January 27, 2020

पालकमंत्र्यांकडून महापालिकेत विविध कामांचा आढावा







अपंग, महिला व बालकांसाठीच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवा
                                                               -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
महानगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी शासन स्तरावर प्रस्ताव मांडणार
अमरावती, दि. 27 : प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये तेथील अपंग, महिला व बालकांसाठी निधी असतो. त्या निधीचा वापर वेळेत करून त्यांना लाभ दिला पाहिजे. जिल्ह्यातील अपंग, महिला व बालकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्राधान्याने खर्च करण्यात यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
पालकमंत्र्यांनी आज महापालिकेच्या शहरातील विविध विकासकामांचा आढावा पालिकेच्या सभागृहात   बैठकीत घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महापौर चेतन गावंडे, उपमहापौर सुमन साहू, मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्यासह अनेक नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अपंग व्यक्ती कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त होणाऱ्या निधीतून अपंग कल्याणकारी योजना राबवून अपंगांचे पुनर्वसन करण्यात येते. हा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना वेळेत खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, सर्वच संस्था हा‍ निधी खर्च करतातच असे चित्र नाही. अपंगांच्या पुनवर्सनासाठी त्यांना स्वत:चा रोजगार उभारण्यासाठी अर्थसहाय्य करुन स्वयंपूर्ण करावे. महिला व बालकांसाठी राज्य शासनाव्दारे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याचा जिल्ह्यातील महिला व बालकांना लाभ मिळावा यासाठी बचतगट, गृहउद्योग, कुटीर व ग्रामोद्योग उभारण्यासाठी मनपाला नियमित निधी प्राप्त होतो. त्या निधीतून महिलांना कौशल्य विकासातून स्वयंपूर्ण व बालकांच्या पोषणासाठी, शैक्षणिक सुविधा आदी कामे नियमित करावी.
            अमृत पाणी पुरवठा, अमृत भूयारी गटार योजने अंतर्गत शहरातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. फेरीवाल्यांसाठी स्पेशल झोन निश्चित करुन या प्रश्नांवर कायमचा तोडगा काढावा. नागरिकांना परवडणारी घर उपलब्धतेसाठी प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजने अंतर्गत घरकुल निर्मितीची कामे विहीत मूदतीत पूर्ण करा. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी, कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराची उपलब्धता, स्वयंरोजगार कार्यक्रम आदी उपक्रम प्रभावीपणे राबवून महिलांना रोजगाराची साधने उपलब्ध करुन देण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
            जिल्ह्याच्या अंबादेवी तिर्थक्षेत्राला दरवर्षी सुमारे दहा लाखांवर भक्तगण दर्शनाला येतात. त्याअनुषंगाने अंबादेवी तीर्थक्षेत्राला अ वर्ग दर्जा मिळण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन शासनाला सादर करावा. शहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या संदर्भात काम पूर्ण करण्यासाठी पोलीस विभागासोबत तातडीने समन्वय बैठक घेऊन नागरिकांची गैरसोय होणार याचा तोडगा काढावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
            अमरावती महानगरपालिका प्रतिष्ठित महानगरपालिका आहे. या संस्थेला वैभव मिळवून देण्याकरीता महानगरपालिकेची नवीन इमारत उभारण्यासाठी शासनस्तरावर मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडणार असल्याची श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक प्रभागाला समान निधी वितरण धोरण राबवून सर्वांच्या स्वप्नातील अमरावतीचा विकास घडवून आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            महानगरपालिका अंदाजपत्रक 2019-20, शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा वार्षिक योजना, अमृत पाणी पुरवठा, अमृत भुयारी गटार योजना, हरित क्षेत्र विकास, महिला व बालविकास, दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, फिशरीज हब स्थापना, छत्री तलाव सौंदर्यीकरण, शिवटेकडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणे, पालखी मार्ग, नागरी दलीत वस्ती सुधार योजना, रमाई घरकुल यांना, घनकचरा व्यवस्थापन, राजापेठ उड्डाणपुल व भूयारी मार्ग, विशेष अनुदान मागणी आदी विविध योजना व कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.
00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...