गतिमान कामकाजासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा ऑनलाईन ‘संवाद’





                                            नववर्षानिमित्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा उपक्रम
नागरिकांना वेळेत सेवा मिळावी म्हणून गतिमान व पारदर्शक कामकाजासाठी नववर्षानिमित्त ‘संवाद’ हे व्यासपीठ माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. नववर्षानिमित्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असून, त्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणींचे गतीने निराकरण करणे शक्य होणार आहे.
सुशासनासाठी ‘ग्रीव्हन्स रिड्रेसल अगेन्स्ट अ सर्व्हिस’चे उद्दिष्ट स्वीकारून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून हे ऑनलाईन व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. नागरिकांना आपले म्हणणे, तक्रारी, निवेदन मांडण्यासाठी संवाद (www.sanvad.in) हे वेबपोर्टल अमरावती जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिले आहे. त्याशिवाय, नागरिकांच्या सोयीसाठी 1800 2336 396 हा हेल्पलाईन क्रमांक सार्वजनिक वेळेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत प्रायोगिक तत्वावर जिल्हाधिकारी कार्यालयातील काही शाखा या पोर्टलशी जोडण्यात येत आहेत. त्यानंतर सर्व शाखा जोडण्यात येतील. जिल्ह्यातील आरोग्य व इतरही सेवांचे हेल्पलाईन क्रमांकही या पोर्टलवर उपलब्ध असतील.
या उपक्रमात जिल्हास्तरीय संवाद कक्ष स्थापन करण्यात येत असून, तो सेंट्रल कॉल सेंटर म्हणून कार्य करेल. नागरिकांचे प्रश्न, अडचणी व शासकीय सेवेसंदर्भात तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संवाद कक्ष सहाय्य करेल. सुशासनासाठी आवश्यक असलेल्या भक्कम सेवा व वितरण प्रणाली, पारदर्शकता व सुस्पष्टता आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले.
डिजीटल इंडियाअंतर्गत जलद व गतिमान सेवा देण्यासाठी हा प्रयत्न आहे. नागरिकांच्या अडचणींचे वेळेत निवारण होण्यासाठी या उपक्रमाची मदत होईल. प्रत्येक कामाच्या नोंदी या माध्यमातून घेता येणार आहेत. सर्व शाखांचा समावेश यात होणार असल्यामुळे एकसंध सुशासन साधता येईल. हा उपक्रम सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर सुरु केला तरी, भविष्यात तो सर्व शाखांतून पूर्णवेळ चालवला जाईल. त्याचा जिल्ह्यातील नागरिकांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास श्री. नवाल यांनी व्यक्त केला.
या पोर्टलवर नागरिकांना आपला मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करता येईल. त्याचप्रमाणे, निवेदनाचे स्टेटसही तपासता येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती