पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा

नियमभंग व बेशिस्त रोखण्यासाठी कायद्याचा धाक निर्माण करा पालकमंत्री यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 20 : अवैध दारूविक्री, गुटखाविक्री, वाहतुकीतील बेशिस्त आदी गुन्हे रोखण्यासाठी पोलीसांकडून सातत्याने कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. कायद्याची जरब नसल्यास गुन्हेगारी फोफावते. त्यामुळे पोलीसांनी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा घडवून आणावी, असे स्पष्ट निर्देश महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, माजी आमदार वीरेंद्र जगताप, प्र. जिल्हाधिकारी संजय पवार, आयपीएस अधिकारी पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्याम घुगे, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

          पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात तरूण पिढी, शाळकरी मुलेही व्यसनांना बळी पडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध दारूविक्री व गुटखाविक्री पूर्णपणे थांबली पाहिजे. या कार्यवाहीत कुठलीही कारणे देऊ नयेत. महिलांवरील अत्याचार, छेडछाडीच्या घटना, बालक अत्याचार घटना पूर्णपणे थांबल्या पाहिजेत. त्यादृष्टीने यंत्रणा अधिक सजग ठेवावी. दामिनी पथक अधिक कार्यक्षम करावे. नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची जपणूक करताना सार्वजनिक सुरक्षिततेसाठी कायदेपालन व शिस्त निर्माण करण्याची जबाबदारी पोलीसांची आहे.  आपल्याला कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करून ही जबाबदारी सुयोग्यरीत्या पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.   

                             वाहतुकीत शिस्त आणा

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावती शहरात इर्विन चौक, गाडगेनगर, जयस्तंभ चौक, अंबादेवी मंदिर मार्ग अशा अनेक ठिकाणी वाहतुकीत विस्कळीतपणा सतत दिसून येतो. परवाना नसतानाही वाहन चालविणा-यांचे, त्यातही किशोरवयीन मुलांचे प्रमाण आढळते. वाहने रस्त्यात लावलेली आढळतात. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बेशिस्त करणारांना पोलीसांचा धाक राहिला नाही, असाच याचा अर्थ आहे. ही परिस्थिती तातडीने सुधारली पाहिजे. वाहतुकीत तत्काळ शिस्त निर्माण करावी व तसा बदल झाल्याचे दिसून आले पाहिजे. परिवहन विभागानेही वेळोवेळी आवश्यक तपासण्या, कारवाई केली पाहिजे.

जिल्ह्यात विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉली फिरत असल्याची तक्रार माजी आमदार श्री. जगताप यांनी केली. त्याचप्रमाणे, वाळू चोरी, शेती साहित्याची चोरी अशा घटनाही वाढत असल्याचे ते म्हणाले. मध्यप्रदेश सीमेलगतच्या गावांत अवैध दारूचे प्रमाण अधिक असल्याची तक्रार आमदार श्री. भुयार यांनी केली. हे प्रकार रोखण्यासाठी काटेकोर कारवाईचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती