गृहमंत्री करणार मूकबधिर 'वर्षा'चे कन्यादान वझ्झर येथील बालगृहाला गृहमंत्र्यांची भेट








अमरावती, दि. १३ : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाला भेट दिली व या बालगृहात राहून मोठी झालेली मूकबधिर मुलगी वर्षा हिचे कन्यादान आपण स्वतः करणार असल्याचे यावेळी सांगितले.
गृहमंत्र्यांनी आज सायंकाळी या बालगृहात जाऊन तेथील मुलांची भेट घेतली व विचारपूस केली.
 यावेळी त्यांनी तेथील मुलांना स्वतः चुलीवर चहा तयार करून पाजला,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबा पापळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आश्रमातील मूकबधिर मुलगी वर्षा तेथील मुलगा समीर याच्याशी विवाह ठरला असून, वर्षाचे कन्यादान गृहमंत्री यांनी करावे, असे श्री. पापळकर यांनी सांगताच गृह मंत्री श्री. देशमुख यांनी तत्काळ सकारात्मकता दर्शवत नागपूरला हा विवाह केला जाईल व आपण वर्षाचे कन्यादान करू, असे सांगितले. 
या वेळी वर्षा व समीर या दोहोंचे आज साक्षगंध होत असल्याचे सांगून त्यांनी पुष्पहार घालून दोहोंचेही अभिनंदन केले.वर्षा ही मुलगी एक दिवसाची असताना नागपूर रेल्वे स्थानकावर आढळली होती. या आश्रमात तिचे पालनपोषण झाले. ती आता २२ वर्षांची आहे.
श्री. पापळकर बाबा हे मतिमंद मूकबधिर बेवारस मुलांसाठी अत्यंत मोलाचे कार्य करत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.या आश्रमात १२३ विकलांग मुले आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण  झाली की नियमानुसार विद्यार्थ्यांना बालगृहात राहता येत नाही. तथापि, हा नियम या मुलांसाठी जाचक असल्याने त्यात सुधारणा आवश्यक असल्याचे श्री. पापळकर यांनी सांगितले. या मागणी बाबत आपण सामाजिक न्याय मंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे यावेळी गृह मंत्र्यांनी सांगितले.

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती