Monday, July 17, 2017

मी मुख्यमंत्री बोलतोय: भाग दुसरा
यांत्रिकी
करणातून उत्पादकता वाढ आणि शेतीतील गुंतवणूकीवर भर
अधिक सवलतीच्या दराने पीक कर्ज देण्याचा विचार
-         मुख्यमंत्र्यांची ग्वाही

शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी 15 जिल्ह्यांत 4000 कोटी रुपयांचा प्रकल्प 
यांत्रिकीकरणातून उत्पादनवाढीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे क्लस्टर करणार
ओटीएसमुळे काळ्या यादीत गेलेल्यांनाही नव्याने पीक कर्ज
100 टक्के शेतीवर उपजिवीका असलेल्यांनाच कर्जमाफीचा लाभ
शेतमालाला बाजारपेठेशी जोडण्यासाठी बृहद योजना तयार करणार
2009 पासूनच्या थकित कर्जाचाही योजनेत समावेश 
नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही लाभ देणारे महाराष्ट्र पहिले राज्य
बँकिंग व्यवस्था टिकण्यासाठी कर्जफेड करावी
कडधान्य नियमनमुक्तीत आणण्याचे विचाराधीन
हमी भाव कमी त्याला कारण शेतीतील उत्पादकता कमी 

मुंबई दि. 16: शेतकरी बांधवांना एक लाखांपर्यंत शून्य टक्के दराने तर एक ते तीन लाखांपर्यंत दोन टक्के दराने शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यापेक्षा अधिक सवलतीच्या दराने कर्ज देता यावे यासाठी नविन योजना विचाराधीन आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कर्जमाफी करतांना निकष म्हणून दुष्काळी वर्षाचा विचार केला जातो. 2012 ते 2015 हे दुष्काळी वर्ष होतं. म्हणून 30 जून 2016 पर्यंतच्या थकित कर्जाचा योजनेत समावेश करण्यात आला. दीड लाखाच्यावरचे थकित कर्जाची रक्कम भरण्याची अंतिम मुदत ही 30 जून 2017 होती, ती एक महिन्यासाठी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या भरवशावर बँकिंग व्यवस्था टिकून आहे त्याकरिता वाढीव मुदतीत कर्ज भरण्याचे आवाहन करीत कर्जमाफीची अंतिम तारिख ही 30 जून 2016 राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतमालाला भाव मिळण्याकरिता बाजारपेठेशी जोडणी करण्यासाठी बृहद  योजना तयार करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
अडचणीतल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनासुरू केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित मी मुख्यमंत्री बोलतोयकार्यक्रमाच्या पहिल्या भागात मुख्यमंत्र्यांनी विविध प्रश्नांना सविस्तर उत्तर देत या योजनेविषयी माहिती दिली होती. दुसऱ्या भागाचे प्रसारण आज विविध दूरचित्रवाहिन्यांवरून करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 
बँकिंग व्यवस्था टिकण्यासाठी कर्जफेड करावी
नागपूरच्या  माणिक चाफेकर यांनी  पुन्हा पेरणीसाठी कर्ज मिळेल का? यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळी वर्षावर आधारित कर्जमाफीचा निर्णय घेतला जातो. राज्यात 2012 ते 2015 सलग दुष्काळी वर्ष होते. त्यामुळे 30 जून 2016 ही कर्जमाफीची अंतिम तारीख ठेवण्यात आली. अनेक जणांना अपेक्षा आहे की 2017 पर्यंत कर्जमाफी मिळेल, म्हणून त्यांनी क्षमता असतांनाही कर्ज भरले नाही. माझी अशा शेतकरी बांधवांना विनंती आहे की, त्यांनी नियमित कर्ज भरावे. त्यांच्या भरवशावर बँकिंग व्यवस्था टिकून आहे. त्यामुळे कर्ज न भरण्याचा निर्णय घेऊ नका. 30 जून 2016 या कर्जमाफीच्या अंतिम दिनांकात बदल करण्याला रिझर्व्ह बॅंकदेखील परवानगी देणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नियमित कर्ज भरणाऱ्यांना योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदानासोबतच विविध शासकीय योजनांचा अधिकचा लाभ देण्यात येईल. 
2009 पासूनच्या थकित कर्जाचाही योजनेत समावेश
1 एप्रिल 2012 पासून पुढील थकीत कर्जाचा योजनेत समावेश करण्यात आला आहे, मात्र 2009 पासून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचं काय याबाबत मच्छिंद्र घोलप यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकांनी ही बाब लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे कर्जमाफी करिता 2012 ऐवजी 2009 पासूनच्या थकित कर्जाचा योजनेत समावेश केला जाईल. 
अधिक सवलतीच्या दरात कर्ज देणारी योजना विचाराधीन
थकबाकीदारांच्या यादीतून नाव वगळल्यावर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळेल, असे सांगत मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, वेगवेगळ्या पिकानुसार जे नियम आहेत त्याप्रमाणे ते कर्ज मिळू शकेल. सध्या तुरीसाठी प्रती एकर 30 हजार रुपये, सोयबीन व कापूस पिकांसाठी 40 हजार रुपये, धानासाठी 45 हजार, संत्रा व मोसंबीसाठी 70 हजार रुपये, ऊसासाठी 90 हजार, डाळींब पिकासाठी 1 लाख 10 हजार, केळीसाठी 1 लाख 20 हजार असे ठरलेल्या निकषानुसार कर्ज देण्यात येते.  शेतकऱ्यांना एक लाखांपर्यंत शून्य टक्के दराने तर एक ते तीन लाखांपर्यंत 2 टक्के दराने हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यात अजून सवलत देता येईल का या दृष्टीने विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 
नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही लाभ देणारे महाराष्ट्र पहिले
विदर्भातील बहुतेक शेतकरी पिक कर्जापासून वंचित आहेत, असा प्रश्न श्रोत्यांमध्ये उपस्थित असणारे धनंजय भोसले यांनी विचारला होता. त्यावर बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, विदर्भातील थकित शेतकऱ्यांची संख्या प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी आहे. बुलडाणा जिल्ह्यात 2 लाख 43 हजार शेतकऱ्यांना नव्याने पिक कर्ज उपलब्ध होईल. यवतमाळ जिल्ह्यात 2 लाख 14 हजार शेतकरी तर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये 2 लाख 10 हजार शेतकरी आहेत. नगरमध्ये 2 लाख शेतकरी, नाशिकमध्ये 1 लाख 60 हजार शेतकरी आहेत. या वर्षी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांकरिता कुठल्याही राज्याने कुठलीही योजना तयार केलेली नाही. तरीही महाराष्ट्र हे असे पहिले राज्य आहे जिथे या वर्षीच्या (नियमित कर्ज भरणारे) शेतकऱ्यांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्याबरोबरच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना योजनांच्या माध्यामतून लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
कडधान्य नियमनमुक्तीत आणण्याचे विचाराधीन
शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी शेतमाल तारण योजना राज्य शासनाने  सुरु केली आहे. जवळपास 43 खासगी बाजार सुरु करण्यात आले आहेत. फळे आणि भाजीपाला नियमनमुक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी कंपन्या थेट मुंबईच्या बाजारात माल विक्रीस आणतात आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. मध्यंतरी धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे पाहता कडधान्य नियमनमुक्तीत आणावीत असा विचार करण्यात येत आहे. 
शेतमालाला बाजारपेठेशी जोडण्यासाठी बृहद योजना तयार करणार
खासगी परवान्यांच्या माध्यमातून आता थेट खरेदी करता येणे शक्य होणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्याला बाजारपेठ खुली करून दिला जाणार नाही तोपर्यंत त्याच्या मालाला भाव मिळू शकणार नाही. त्यामुळेच बाजार खुला करण्याची व्यवस्था करण्यासाठी कायद्यामध्ये वेगवेगळे बदल करण्यात आलेले आहेत. 45 निर्यात सुविधा केंद्र व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे 72 आठवडी बाजार मोठ्या शहरांमध्ये सुरु करण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदानाच्या माध्यमातून बाजार साखळी तयार करण्यात येत आहे. त्याची देखील बृहद योजना तयार करण्यात येत आहे. या सगळ्यांचा लाभ शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 
100 टक्के शेतीवर उपजिवीका असलेल्यांनाच कर्जमाफीचा लाभ
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ज्यांची आर्थिक उलाढाल 10 लाखाच्यावर आहे त्यांना कर्जमाफीच्या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यांना यासाठी  वगळण्यात आले की त्यांचा काहीतरी जोडव्यवसाय आहे. केवळ 100 टक्के शेतीवर उपजिवीका असलेल्यांनाच कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. 
ओटीएसमुळे काळ्या यादीत गेलेल्यांनाही नव्याने पीक कर्ज
आता जी एकरकमी परतफेड करण्यात येतेय त्यामाध्यमातून थकित शेतकऱ्याला नव्याने कर्ज मिळू शकेल. त्याला काळ्या यादीत टाकले जाणार नाही. जुन्या कुठल्या एक रकमी परतफेडी मुळे जर कुणी काळ्या यादीत टाकला गेला असेल तर त्या शेतकऱ्याला नव्याने पिक कर्ज मिळू शकेल ही व्यवस्था आम्ही नक्की करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी पुणतांबा येथील शेतकरी धनंजय जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना दिली.




ॲक्सिस बँकेची न्यायालयीन कार्यकक्षा मुंबई किंवा नाशिक येथे करावी
ॲक्सिस बँकेच्या न्यायालयीन कार्यकक्षा संदर्भात श्री. जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, या बॅंकेची न्यायलयीन कार्यकक्षा कोलकाता येथे असण्याचे काही कारण नाही.  तात्काळ राज्यस्तरीय बँकिंग समितीच्या अध्यक्षांना याबाबत कळविण्यात येईल. आणि  या बँकेची  न्यायालयीन कार्यकक्षा मुंबई किंवा नाशिक करण्यासाठी निर्देश देण्यात येतील.
ऑक्टोबर 2018 पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्ताचा संकल्प
शेतकऱ्यांना कर्जमाफी देतांना वैयक्तिक शौचालयांची अट असावी, अशी संकल्पना बेनोडा शहीद येथील राजेश्वर ठाकरे यांनी सुचविली होती. त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, ही चांगली सूचना आहे. मात्र अशी अट न टाकताही महाराष्ट्रातील सामान्य माणसाने हागणदारीमुक्तीसाठी अतिशय चांगला प्रयत्न केला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये 40 लाख शौचालये राज्यात बांधली गेली आहेत. राज्यातील 11 जिल्हे आणि 155 तालुके तसेच 16000 ग्राम पंचायती  24000 गावं  हागणदारीमुक्त झाले आहेत. ऑक्टोबर  2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प आहे. या सूचनेवर योग्य लोकांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ.
हमी भाव कमी त्याला कारण शेतीतील उत्पादकता कमी
चाफळ येथील निलेश पवार  यांनी कर्जमाफी दिल्यावर पुन्हा त्या शेतकऱ्यावर कर्ज होऊ नये यासाठी काही उपाययोजना सरकारने केल्या आहेत ? असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले की,  आपल्याला शेतीतील उत्पादकता वाढवावी लागेल. आज हमीभाव आपल्याला का परवडत नाही तर आपली शेतीतील उत्पादकता कमी आहे. हमीभाव तर संपूर्ण देशात सारखा असतो. स्वामिनाथन यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच हमीभाव निघतो, पण प्रत्येकवेळी तो हमीभाव आपल्याला परवडत नाही प्रत्येक राज्याचा उत्पादन खर्च वेगवेगळा आहे. त्यामुळे दोन राज्यांमधील हमी भावात तफावत आढळून येते. आपले उत्पादन कसे वाढविता येईल, शेतीतला खर्च कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करावा लागेल. त्याकरिता शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवावी लागेल आणि आता सध्या राज्य शासनाचा प्रयत्न हाच आहे. 
यांत्रिकीकरणातून उत्पादनवाढीसाठी
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे क्लस्टर करणार
यांत्रिकीचा वापर शेतीत मोठ्या प्रमाणात व्हावा असा प्रयत्न आहे. पण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकत नाही त्यामुळे आपण जर शेतकरी उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात सगळ्या प्रकारची आधुनिक यंत्रसामुग्री दिली तर त्या त्या गावामध्ये ती यंत्रसामुग्री भाड्याने शेतकऱ्यांना दिल्यास शेतकऱ्याचे नुकसान टाळून उत्पादकता वाढविता येईल. त्यासाठीची योजना देखील राज्य सरकारने तयार केली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करून त्याचे क्लस्टर करून त्याला सर्व प्रकारच्या यांत्रिकीकरणाकरिता सवलत द्यायची आणि त्या माध्यमातून गावातल्या छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यायचे, हा आमचा प्रयत्न आहे. 
शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी
4000 कोटी  रुपयांचा गुंतवणूक प्रकल्प

विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ 15 जिल्ह्यांमधील गावांमध्ये राबविण्यासाठी आम्ही जागतिक बँकेच्या सहाय्याने एक योजना तयार केली आहे. या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी 4000 कोटी  रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सांगितले. 

Friday, July 7, 2017

अमरावतीला लवकरच शासकीय वैद्यकीय महाविदयालय मिळेल
                        -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक
पालकमंत्र्यांची  मुख्यमंत्र्यांसह चर्चा
अमरावती, दि. 7 अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असून लवकरच या संदर्भात बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती  जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी दिली.
 पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासकीय वैदयकीय महाविद्यालयाबाबत अनुकुलता दर्शवली. 
अमरावती हे महसूली विभागाचे ठिकाण असूनही अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अमरावतीच्या तुलनेत छोट्या असलेल्या अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर या शहरांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. हे लक्षात घेऊन येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे, असे श्री. पोटे-पाटील यांनी चर्चेत सांगितले. त्यावेळी या मागणीला मुख्यमंत्र्यांनी अनुकुलता दाखवली.
 पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला लागणाऱ्या पायाभूत सुविधांची माहिती घेण्यासाठी जून महिन्याच्या शेवटी जिल्हा सामान्य रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाची पूर्व पाहणी केली.  त्यानुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अमरावतीत उपलब्ध असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यानुसार मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे याप्रश्नी सकारात्मक असल्याने अमरावतीला लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळेल, असा आशावाद पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
00000
चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा अमरावतीत वनमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप
आता एकच लक्ष्य- 13 कोटी वृक्ष
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
अमरावती, दि. 7 : महाराष्ट्रातील जनतेने वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होत ४ कोटींच्या उद्दिष्ट्याहून अधिक झाडांची लागवड यशस्वी करुन दाखवली. राज्यातील वनक्षेत्राची व्याप्ती वाढविण्याच्या हेतूने वनविभागाने पुढील वर्षासाठी 13 कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून त्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. 

राज्यभरात वृक्षलागवड मोहिमेत सुमारे 5 कोटी झाडांची लागवड करण्यात आली. या मोहिमेचा समारोप आज अमरावतीत झाला. यानिमित्त वडाळी बांबू उद्यानातील  निसर्ग निवर्चन केंद्र व ‘ऑक्सिजन पार्क’चे उद्घाटनही वनमंत्र्यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार डॉ. अनिल बोंडे, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्याताई टिकले, विभागीय आयुक्त डॉ. पीयुष सिंह, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चौहान, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना आदी यावेळी उपस्थित होते.
            वृक्षलागवड मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल महाराष्ट्रातील नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत श्री. मुनगंटीवार म्हणाले की, ही वसुंधरा व पर्यावरण वाचविण्यासाठी आपण स्वत: काय योगदान देऊ शकू, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. याच विचारातून अधिकाधिक लोकांचा सहभाग मिळवत हे अभियान रुजू केले. अभियानात सर्व स्तरातील लोक सहभागी झाले. त्यात वयोवृद्ध, दिव्यांग, दृष्टीहीन लोकांनीही वृक्षारोपण केले. मोहिमेत लावलेले प्रत्येक झाड जगले पाहिजे व या कामात पारदर्शकता राहावी म्हणून गुगल मॅपिंगचे तंत्र वापरण्याचा निर्णय घेतला. नकारात्मकतेला सकारात्मकतेकडे वळविण्याचे आव्हान या मोहिमेतून पेलले आहे.
मोहिमेच्या यशस्वितेबद्दल त्यांनी नागरिकांसह सर्व विभाग, अधिकारी- कर्मचा-यांचे अभिनंदन केले, तसेच ग्रीन आर्मीत सहभागी होण्याचे आवाहन सर्वांना केले.  

अभियानाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद : पालकमंत्री श्री. पोटे- पाटील
वृक्ष लागवड अभियानाच्या या यशाची इतिहासात सुवर्णाक्षरांत नोंद होईल, असे सांगून पालकमंत्री श्री. पोटे-पाटील म्हणाले की, वृक्षलागवडीचे हे कार्य येणा-या पिढ्यांना उपयुक्त  ठरेल. वृक्षलागवडीचे हे अभियान पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर व अधिक उत्साहाने राबविण्यात येईल.
ऑक्सिजन पार्कची संकल्पना उत्कृष्ट आहे. शहराचे पर्यावरण समृद्ध करण्यास ती उपयुक्त ठरेल, असे खासदार श्री. अडसूळ यांनी सांगितले.
आमदार डॉ. देशमुख म्हणाले की, वनविभागाच्या मोठ्या जागेची अवस्था ही डंपिंग ग्राऊंडसारखी झाली होती. त्यामुळे येथे ऑक्सिजन पार्कचा प्रस्ताव देऊन त्याच्या कुंपणासाठी चौदाव्या वित्त आयोगातून 32 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. झाडांची आरोग्यासाठीची उपयुक्तता लक्षात घेऊन शहरातील टेकड्याही वृक्षारोपणातून हिरव्यागार व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अमरावती विभागात 54.88 लाख झाडे लावण्यात आली असून, त्यात 2 लाख 7 हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला, असे श्री. सिंह यांनी प्रास्ताविकात सांगितले. जिल्ह्यात 8 लाख 96 हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी वृक्षसंवर्धनाच्या कार्यात योगदान देणा-या विविध संस्था व व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
00000






DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...