चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा अमरावतीत वनमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप
आता एकच लक्ष्य- 13 कोटी वृक्ष
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
अमरावती, दि. 7 : महाराष्ट्रातील जनतेने वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होत ४ कोटींच्या उद्दिष्ट्याहून अधिक झाडांची लागवड यशस्वी करुन दाखवली. राज्यातील वनक्षेत्राची व्याप्ती वाढविण्याच्या हेतूने वनविभागाने पुढील वर्षासाठी 13 कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून त्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. 

राज्यभरात वृक्षलागवड मोहिमेत सुमारे 5 कोटी झाडांची लागवड करण्यात आली. या मोहिमेचा समारोप आज अमरावतीत झाला. यानिमित्त वडाळी बांबू उद्यानातील  निसर्ग निवर्चन केंद्र व ‘ऑक्सिजन पार्क’चे उद्घाटनही वनमंत्र्यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार डॉ. अनिल बोंडे, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्याताई टिकले, विभागीय आयुक्त डॉ. पीयुष सिंह, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चौहान, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना आदी यावेळी उपस्थित होते.
            वृक्षलागवड मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल महाराष्ट्रातील नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत श्री. मुनगंटीवार म्हणाले की, ही वसुंधरा व पर्यावरण वाचविण्यासाठी आपण स्वत: काय योगदान देऊ शकू, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. याच विचारातून अधिकाधिक लोकांचा सहभाग मिळवत हे अभियान रुजू केले. अभियानात सर्व स्तरातील लोक सहभागी झाले. त्यात वयोवृद्ध, दिव्यांग, दृष्टीहीन लोकांनीही वृक्षारोपण केले. मोहिमेत लावलेले प्रत्येक झाड जगले पाहिजे व या कामात पारदर्शकता राहावी म्हणून गुगल मॅपिंगचे तंत्र वापरण्याचा निर्णय घेतला. नकारात्मकतेला सकारात्मकतेकडे वळविण्याचे आव्हान या मोहिमेतून पेलले आहे.
मोहिमेच्या यशस्वितेबद्दल त्यांनी नागरिकांसह सर्व विभाग, अधिकारी- कर्मचा-यांचे अभिनंदन केले, तसेच ग्रीन आर्मीत सहभागी होण्याचे आवाहन सर्वांना केले.  

अभियानाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद : पालकमंत्री श्री. पोटे- पाटील
वृक्ष लागवड अभियानाच्या या यशाची इतिहासात सुवर्णाक्षरांत नोंद होईल, असे सांगून पालकमंत्री श्री. पोटे-पाटील म्हणाले की, वृक्षलागवडीचे हे कार्य येणा-या पिढ्यांना उपयुक्त  ठरेल. वृक्षलागवडीचे हे अभियान पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर व अधिक उत्साहाने राबविण्यात येईल.
ऑक्सिजन पार्कची संकल्पना उत्कृष्ट आहे. शहराचे पर्यावरण समृद्ध करण्यास ती उपयुक्त ठरेल, असे खासदार श्री. अडसूळ यांनी सांगितले.
आमदार डॉ. देशमुख म्हणाले की, वनविभागाच्या मोठ्या जागेची अवस्था ही डंपिंग ग्राऊंडसारखी झाली होती. त्यामुळे येथे ऑक्सिजन पार्कचा प्रस्ताव देऊन त्याच्या कुंपणासाठी चौदाव्या वित्त आयोगातून 32 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. झाडांची आरोग्यासाठीची उपयुक्तता लक्षात घेऊन शहरातील टेकड्याही वृक्षारोपणातून हिरव्यागार व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अमरावती विभागात 54.88 लाख झाडे लावण्यात आली असून, त्यात 2 लाख 7 हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला, असे श्री. सिंह यांनी प्रास्ताविकात सांगितले. जिल्ह्यात 8 लाख 96 हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी वृक्षसंवर्धनाच्या कार्यात योगदान देणा-या विविध संस्था व व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
00000






Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती