Saturday, July 1, 2017

नव्या संशोधनाची दखल घेऊन शेतीविकासाला चालना
-          पालकमंत्री प्रवीण पोटेपाटील

अमरावती, दि. 1 : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी शेतीच्या प्रगतीसाठी  मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन राज्य शासनाकडूनही शेतऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या योजना राबविल्या जात आहेत. नव्या संशोधनातून शेतीत अनेक चांगले    प्रयोग होत आहेत. या प्रयोगाची दखल घेऊन शेतीच्या विकासाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा  परिषदेच्या सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे होते. खासदार आनंदराव अडसूळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ताजी ढोमणे, बांधकाम सभापती जयंत देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रयोगशील शेतकरी रवींद्र माणिकराव मेटकर (बडनेरा) व झाबू सोनाजी जामूनकर (रेहेटखेडा, ता. चिखलदरा) यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्यांचे कौतुक करत पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, शेतीतील उत्कृष्ट प्रयोगशील कार्याचा शासनाकडून गौरव तर होतोच, त्याचबरोबर त्यातील संशोधनाचा अंगीकार करत शेतीविषयक विकासप्रक्रियेला गती देण्याचाही प्रयत्न केला जात आहे.  अशा प्रयोगशील शेतक-यांच्या यशोगाथा समाजापुढे येणे आवश्यक आहे.
श्री. अडसूळ म्हणाले की, प्रत्येक शेतकऱ्याला माती परीक्षण कार्ड देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे जेणेकरुन मातीची तपासणी करुन कुठले पीक घेणे उपयुक्त ठरेल याचा अंदाज मिळू शकेल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पोस्टर व माहिती पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी झाले. कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा कृषी अधिकारी वरुण देशमुख यांनी आभार मानले.
00000




No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...