Thursday, July 6, 2017

ह्युमन मिल्क बँक, ज्येष्ठ नागरिक वॉर्डचे लोकार्पण
उत्तम आरोग्य सेवेसाठी राज्य शासन कटिबद्ध
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत
अमरावती, दि. ६ :  नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नवनवे प्रकल्प राबविले जात आहेत. ह्युमन मिल्क बँकेसारखा महत्वपूर्ण उपक्रम आईच्या दूधापासून वंचित राहणा-या बालकांसाठी जीवनदायी ठरेल. उत्तम आरोग्य सेवेसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज सांगितले.
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय व संदर्भ सेवा रुग्णालयाला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली व  रुग्णांशी संवाद साधला. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिक वॉर्ड, जिल्हा स्त्री रुग्णालयात ह्युमन मिल्क बँक व अतिदक्षता विभागाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तसेच खासदार आनंदराव अडसूळ यांच्या स्थानिक विकासनिधीतून कुष्ठरुग्ण सेवा वाहिनीचेही लोकार्पणही करण्यात आले. खासदार श्री. अडसूळ, आमदार सुनील देशमुख, आमदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर, श्री. जयस्वाल आदी यावेळी उपस्थित होते. 
आरोग्यमंत्र्यांनी यावेळी तिन्ही रुग्णालयांना भेट देऊन प्रत्येक कामाची माहिती घेतली. यावेळी सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील डायलिसीस युनिट व लवकरच कार्यान्वित होत असलेल्या किडनी ट्रान्सप्लान्ट युनिटच्या कामाबद्दलही त्यांनी जाणून घेतले व या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. ह्युमन मिल्क बँकेसारखा उपक्रम आईच्या दूधापासून वंचित राहणा-या बालकांसाठी जीवनदायी ठरेल, असे ते यावेळी म्हणाले.
ह्युमन मिल्क बँकेचे लोकार्पण
आईच्या दूधापासून वंचित राहणा-या नवजात शिशूंना दूध उपलब्ध व्हावे, या हेतूने ‘ह्यूमन मिल्क बैंक’ सुरु करण्यात आली आहे. बाळाच्या जन्मापासून सहा महिन्यांपर्यंत आईचे दूध हा त्याच्यासाठीचा सर्वात सुरक्षित आहार मानला जातो. त्यामुळे काही कारणांमुळे बाळाला आईचे दूध न मिळाल्यास त्याचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. हे लक्षात घेऊन ही बँक सुरु करण्यात आली आहे. देशात अनेक ठिकाणी ही बँक सुरु आहे. या बँकेसाठी मातांकडून स्वेच्छापूर्वक दूध दान करण्यात येईल. हे दूध ४५ दिवसांपर्यंत सुरक्षित राहू शकते व गरजू बाळाला उपलब्ध करुन देता येते, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वारे यांनी दिली.  
00000





No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...