'इर्विन'मध्ये हृदयरोग, कर्करोग निदान व उपचारासाठी ओपीडी

 










'इर्विन'मध्ये हृदयरोग, कर्करोग निदान व उपचारासाठी ओपीडी

गरीब व गरजू रुग्णांसाठी सुविधा

-         जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

                अमरावती, दि. 24 : जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना हृदयरोग, कर्करोग सारख्या मोठ्या आजारावर तत्काळ वैद्यकीय उपचार सुविधा मिळावी यासाठी जिल्हा राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात हृदयरोग व कर्करोगासंबंधी निदान व उपचारासाठी ओपीडी सुरु करण्यात आली आहे. या ओपीडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांनी येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.

             शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील श्री गजानन महाराज व साई महाराज मंदिरामागील परिसरात स्थापित कर्करोग व हृदयरोग ओपीडीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. भूषण सोनवणे, कर्करोग तज्ज्ञ डॉ. वैभव चौधरी यांच्यासह आरोग्य क्षेत्रातील इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

                श्री. नवाल म्हणाले की, हृदयरोग व कर्करोगसारख्या मोठ्या आजारावर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना नागपूर, मुंबई सारख्या मोठ्या शहरात जावे लागते. आजारावर वैद्यकीय उपचार करण्यासाठीचा खर्च त्यांना परवडण्यासारखा नसतो. अशा रुग्णांना जिल्ह्यातच तपासणी व उपचार सुविधा मिळाली तर ते त्यांना सोईचे होते. यासाठी शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिनस्त हृदयरोग व कर्करोग आजाराची ओपीडी सुरु करण्यात आली आहे.  रुग्णांनी या ठिकाणी सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार आदी घ्यावेत. गोरगरीब रुग्णांना आवश्यक उपचार करण्यासाठी महात्मा जोतीराव जीवनदायी योजनेचा लाभ सुध्दा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु करण्यात या बाहृय रुग्ण विभागाला हृदयरोग आजारासंबंधी डॉ. भूषण सोनवणे तपासणी करणार असून दर सोमवारी व गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ओपीडी सुरु राहील. कर्करोग आजारासंबधी डॉ. वैभव चौधरी तपासणी करणार असून त्यांची ओपीडी दर महिन्याच्या तीसऱ्या शनिवारी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहतील. जिल्ह्यातील हृदयरोग व कर्करोग आजाराच्या रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाव्दारे करण्यात आले आहे.

                या आरोग्य केंद्रात कर्करोगावर वैद्यकीय उपचार युनिट हे मागील तीन वर्षापासून कार्यरत आहे. याठिकाणी आता नव्याने हृदयरोग संबंधी ओपीडी सुरु झाल्याने अनेक रुग्णांना उपचार घेणे सोईचे होणार आहे. या दोन्ही ओपीडी यंत्र सामुग्री व औषधीनी सुसज्ज असून अधिपरिचारिका हरिष काटकर, सौ. सुषमा मोहिते, सौ. पल्लवी पेठे, डाटा एन्ट्री ऑपरेटर अमित देशमुख व इतर कर्मचारी याठिकाणी रुग्णांना आरोग्य सेवा-सुविधा पुरवितात.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती