जल जीवन मिशनच्या कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

 







जल जीवन मिशनच्या कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

सर्वदूर शुद्ध पाणीपुरवठ्याला शासनाचे प्राधान्य

प्रशासनाने ‘मिशनमोड’वर कामे करावी

 

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

            अमरावती, दि. 6 : जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागात घरोघर नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात सर्वदूर शुद्ध पेयजल उपलब्ध होण्यासाठी पाणीपुरवठ्याच्या अधिकाधिक कामांचा समावेश होणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुकानिहाय गरज व लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घेऊन परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. सर्वदूर शुद्ध पाणीपुरवठ्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘मिशनमोड’वर ही कामे पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

          जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जि. प. पाणीपुरवठा अभियंता राजेंद्र सावळीकर, हरिभाऊ मोहोड आदी यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. जल जीवन मिशनमध्ये घरोघर नळजोडणीद्वारे शुद्ध पेयजल पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. याअनुषंगाने ग्रामीण भागात आवश्यक तिथे पाणीपुरवठ्याच्या विविध योजना निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तालुकानिहाय आवश्यकता व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन परिपूर्ण प्रस्ताव वेळेत सादर करावेत. पाणीपुरवठ्याच्या कामाचे प्राधान्य लक्षात घेऊन ही कामे मिशनमोडवर पूर्ण होणे आवश्यक आहे.

            याबाबत तालुकास्तरावर गटविकास अधिका-यांकडून स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव नियोजित कामांत करावा. एका आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी. याबाबत आठवडाभराने पुन्हा आढावा घेतला जाईल. ज्या कामांना मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे, त्यांची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी. कुठेही विलंब होता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

            जल जीवन मिशनमध्ये ग्रामीण भागात 4 लाख 56 हजार 621 घरांपैकी यंदाच्या उद्दिष्टानुसार 94 हजार 415 घरांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे.  त्यातील 44 हजार 606 नळजोडणीची कामे झाली आहेत. 49 हजार 809 नळजोडणीची कामे पूर्ण झालेली नाहीत. गावोगाव शंभर टक्के घरगुती नळजोडणी या मिशनमधून साध्य होणार आहे.  

                                    000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती