जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 









पालकमंत्र्यांकडून पर्यटन विकासाचा आढावा

जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी

नाविन्यपूर्ण संकल्पना राबवा

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. ७ : वनसंपदेने नटलेल्या अमरावती जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या मोठ्या शक्यता आहेत. त्यानुसार वनांचे संवर्धन, स्थानिकांना रोजगार व पर्यटनाला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील पर्यटन विकासकामांचा आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह वन विभागाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात वनांप्रमाणेच प्राचीन, धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेली अनेक स्थळे आहेत. त्यामुळे सर्वंकष विचार करून सविस्तर आराखडा करावा.पर्यटनाला चालना देत स्थानिकांना रोजगार मिळवून द्यावा. त्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. जिल्ह्याच्या ठिकाठिकाणच्या प्रवेशस्थानी संपूर्ण पर्यटनस्थळाची व उपक्रमाची माहिती देणारे बोर्ड लावावेत. या भूमीचे पौराणिक महत्व मोठे आहे. माता रुक्मिणीचे हे माहेर आहे. अशा पौराणिक धार्मिक स्थळांच्या विकासाचाही समावेश आराखड्यात करावा, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

आमझरी व विविध ठिकाणी सुरू केलेली झिपलाईन ऍक्टिव्हिटी मेळघाटात लोकप्रिय झाली आहे. कोलखासमध्ये चार हत्ती एकत्र आणून हत्ती सफारी सुरु केली. बफर क्षेत्रातील बुद्ध पौर्णिमेच्या उपक्रमाप्रमाणेच जंगलात पौर्णिमेच्या दिवशी मचाणावरून अरण्यदर्शन सुरू केले आहे. हरीसालजवळून वाहणाऱ्या नदीत   बोटिंग सुरू केले. वैराट सफारी व  भ्रमंतीसाठी बस सुरू केल्या आहेत. स्थानिकांना या सगळ्या उपक्रमात सहभागी करून रोजगार दिला जात आहे, अशी माहिती वन अधिकारी श्री. बाला यांनी दिली.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती