रखडलेल्या विकासकामांना मिळणार गती

आदर्श ग्राम धामोरी येथील विकासकामांसाठी 85 लाख रूपये वितरीत

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

 

अमरावती, दि. 23 : प्रादेशिक पर्यटन योजनेत सांसद आदर्श ग्राम धामोरी येथील नियोजित कामांसाठी गत आठवड्यात 30 लाखांचा निधी वितरीत झाला. त्यापुढील निधीही तत्काळ मिळून विकासकामे लवकर पूर्ण होण्यासाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे पुढील टप्प्यातील 85 लाख रूपयेही शासनाकडून वितरीत करण्यात आले आहेत.  त्यामुळे तेथील रखडलेल्या विकासकामांना गती मिळणार आहे.  

प्रादेशिक पर्यटन योजनेत भातकुली तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम धामोरी येथील विकासकामांसाठी 2 कोटी 5 लक्ष रूपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी प्रत्येकी 30 लक्ष रूपये निधी दोन टप्प्यात प्राप्त झाला. नियोजित कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने कामात अडथळे आले. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन पाठवून याबाबत प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा केला. त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आता पुढील टप्प्यातील 85 लाख रूपयेही वितरीत करण्यात आले आहेत.

            विकासासाठी निधीची उणीव भासू देणार नाही : पालकमंत्री श्रीमती ठाकूर

आदर्श ग्राम धामोरी येथे विविध पायाभूत सुविधा व सौंदर्यीकरणाचे नियोजित केली असून, निधी प्राप्त झाल्यामुळे कामांना गती मिळणार आहे. अनेकदा नियोजित कामे निधीअभावी रखडतात. मात्र, प्रशासनाने वेळीच ही बाब निदर्शनास आणून दिली पाहिजे. जिल्ह्यात कुठेही विकासकामांसाठी निधीची उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी दिली. ग्रामीण भागात विविध दर्जेदार पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी, यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

                आदर्श ग्राममध्ये पायाभूत सुविधा आणि सौंदर्यीकरणही                          

पर्यटनस्थळांच्या ठिकाणी  पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक विकास पर्यटन योजना राबवली जाते. आदर्श ग्राम धामोरी येथे पायाभूत सुविधांसह सौंदर्यीकरणाची अनेक कामे 2 कोटी 5 लक्ष रूपये निधीतून केली जाणार आहेत.   

धामोरी येथे मुख्य रस्त्यापासून तलावापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉकने सुधारणा करण्यासाठी 43 लक्ष 30 हजार, स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी 11 लक्ष 70 हजार, धामोरी येथील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी 25 लक्ष, तलावाच्या आऊटलेटवर लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी 22 लक्ष निधी मंजूर आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने व बाळगोपाळांसाठी खेळण्यासाठी 40 लक्ष रूपये निधीतून भव्य खेळणीही बसविण्यात येणार आहेत.

धामोरीतील विद्युतीकरण व सौर वीज पथदिव्यांसाठी 25 लक्ष 60 हजार रूपये, तर पेयजल उपाययोजनांसाठी 20 लक्ष 50 हजार रूपये निधी मंजूर असून, आकस्मिक खर्चाची तरतूद 7.52 लक्ष, सेंटेज चार्जेस 9.40 लक्ष तरतूदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शासनाकडून निधी वितरीत होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती