जिल्ह्यात विशेष मॉडेल राबवत पांदणरस्त्यांच्या कामांना गती दिल्याने आता शेतात येण्याजाण्यासाठी बारमाही रस्ते तयार होतील. शेतीमालाची वाहतूक सुरळीत होऊन शेतकरी बांधवांना लाभ मिळेल.

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 अभिसरणातून नियोजनपूर्वक कामे राबविण्यात येत आहेत. यानंतरच्या टप्प्यात आणखी दोन हजार किमी लांबीचे पांदणरस्ते तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

-         जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

जिल्ह्यात अभिसरणातून सोळाशे कि. मी. लांबीच्या पांदणरस्ते निर्मितीला वेग

 

अमरावती, दि. 1 : पांदणरस्त्याचे मजबुतीकरण होऊन शेतकरी बांधवांना शेतापर्यंत पोहोचणे व मालाची वाहतूक करणे सोयीचे जावे यासाठी जिल्ह्यात अभिसरणातून 1 हजार 640 किलोमीटर लांबीचे पांदणरस्ते आकारास येत आहेत.

            अभिसरणातून अधिकाधिक कामे घेऊन पांदणरस्ते योजनेचे जिल्ह्यात विशेष मॉडेल राबविण्याबाबत निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार विविध विधानसभा सदस्य व लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहयोगातून स्थानिक विकास निधी, मनरेगा, जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचा वापर करून अभिसरणातून पांदणरस्त्यांच्या कामांना गती देण्यात आली आहे.

            जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडून त्यांच्या तालुक्यातील अपेक्षित कामांचे परिपूर्ण नियोजन तयार करून घेतले. महाराजस्व अभियान राबवून 1176 रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले.  त्यात 1293 किमी लांबीच्या अतिक्रमणमुक्त पांदणीत कच्चा रस्ता तयार करण्यात येणार आहे. 163 किमी कच्च्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे, तसेच त्याव्यतिरिक्त  सुमारे 94 किमी रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे तयार करण्यात येणार आहे.

 

            पांदणरस्त्यांच्या कामांना मान्यवर लोकप्रतिनिधींच्या सहयोगातून स्थानिक विकास निधी, मनरेगा, डीपीडीसी आदी विविध बाबींतून निधी उपलब्ध करून देण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतून 21 कोटी 17 लक्ष व आमदार निधी, ठक्कर बाप्पा योजनेतून 8 कोटी 48 लक्ष निधी देण्यात आला आहे. उर्वरित निधी मनरेगातून उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी दिली.

                                    रस्ता मजबुतीकरणाबरोबरच अतिक्रमणही दूर होते

  पालकमंत्री पांदणरस्ते योजनेत कच्चा रस्ता मजबुतीकरण करणे, अतिक्रमण काढून कच्चा रस्ता तयार करणे, तसेच अतिक्रमण काढून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे तयार करण्यात येतो, अशी माहिती श्री. लंके यांनी दिली.

                                                जिल्हाधिका-यांनी केली पाहणी

            दरम्यान, जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज वेगवेगळ्या ठिकाणी पांदणरस्त्यांची पाहणी करून कामांना वेग देण्याचे निर्देश दिले. उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यावेळी उपस्थित होते.

                                                000  

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती