ऑनलाईन सात-बारासारख्या सुविधा केवळ एका क्लिकवर

 



ऑनलाईन सात-बारासारख्या सुविधा केवळ एका क्लिकवर

 या सुविधेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

तहसील कार्यालयात सुविधा सुरू

 

अमरावती, दि. 21 : शेतकरी तसेच नागरिकांना ऑनलाईन सात-बारा तसेच तत्सम सुविधांसाठी आता शासकीय तसेच तलाठी कार्यालयात वेळ खर्च करण्याची गरज नाही. केवळ मशिनच्या एका क्लिकवर ऑनलाईन स्वरुपातला सात-बारा तसेच अन्य सुविधा सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऑनलाईन सात-बारा प्राप्त होणाऱ्या मशिनचे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी मनिष फुलझेले, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल्ल मेहेर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती कौर म्हणाल्या, शेतकरी तसेच नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळावा तसेच आवश्यक कागदपत्रांसाठी त्यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यात पारदर्शकता व गती निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या माध्यमातून शासकीय कामकाजामध्ये जलद, वस्तूनिष्ठ व पारदर्शकतेसाठी सात-बारा मशिन मदतनीस ठरणार आहे. यामध्ये जुने सात-बारा, कोतवाल बुक, गाव नमुना आठ-अ, पेरे पत्रक, नोंदणी, जुने फेरफार तसेच ऑनलाईन सात-बारा या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या सुविधेंतर्गत शासकीय नोंदणीकक्षातील सर्व कागदपत्रे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन ऑनलाईन करण्यात आली असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

ऑनलाईन सात-बारा मशिन अंतर्गत प्रत्येक सुविधेसाठी केवळ तीस रुपयांचा खर्च येणार आहे. ही मशिन वापरणे शेतकरी तसेच नागरिकांना सहज शक्य आहे. या मशिनमध्ये सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये जी सुविधा हवी असेल, ती निवडून आवश्यक ते कागदपत्रे त्वरित प्राप्त करता येईल. मशिनच्या स्क्रीनवर सर्वप्रथम जिल्हा निवड करुन त्यामध्ये तालुका, गावाचे नाव, आवश्यक असलेल्या कागदपत्राचे नाव, सुविधेचे नाव निवडून शुल्क अदा करावे. त्यानंतर त्या कागदपत्राची प्रिंटआऊट प्राप्त होईल. नागरिकांना या यंत्रणेचा वापर करताना मार्गदर्शन मिळण्यासाठी ही मशिन अमरावती तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात येत आहे. तेथील संबंधित कर्मचारी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करणार आहे. सात-बारा डिजीटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही, शिक्क्याची गरज नाही, असे श्री. भोसले यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती