Thursday, February 16, 2023

बाल सुरक्षा अभियानात जिल्ह्यात होणार 4 लाख बालकांची आरोग्य तपासणी - जिल्हाधिकारी पवनीत कौर


 

बाल सुरक्षा अभियानात जिल्ह्यात होणार 4 लाख बालकांची आरोग्य तपासणी

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 15 : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे बाल सुरक्षा अभियान अर्थात जागरूक पालक-सुदृढ बालक मोहिमेत जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालके, तसेच किशोरवयीन मुलामुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. विविध विभागांच्या समन्वयाने ही मोहिम यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

 बाल सुरक्षा अभियान, नियामक रुग्ण कल्याण समिती, एड्स नियंत्रण समिती व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक समिती आदी विविध विषयांवरील बैठका आज महसूलभवनात जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, अभियानात जिल्ह्यातील ४ लक्ष २ हजार ९५८ बालके, किशोरवयीन मुलांची प्राथमिक आरोग्य तपासणी, आजारी आढळल्यास उपचार, गरजूंना संदर्भ सेवा देऊन उपचार, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे व सुरक्षित सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात येईल. तपासणी पथकात समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका आदी मनुष्यबळासह आवश्यक सर्व साधने उपलब्ध असावीत. जिल्ह्यातील शहरे व ग्रामीण भागातील एकही बालक तपासणीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचाही आढावा जिल्हाधिका-यांनी घेतला. या कार्यक्रमात जिल्ह्यात एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत 66 लक्ष 59 हजार 888 रू. रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे, तपासणी पथकांनी 230 व्यक्तींवर केलेल्या कारवाईत 45 हजार 69 रू. दंड वसूल करण्यात आला. तथापि, शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत तक्रारी प्राप्त होतात. त्यासाठी संपूर्ण तपासणी करून वेळोवेळी काटेकोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. मौखिक आरोग्य नियंत्रण कार्यक्रम व स्वच्छ मुख अभियान प्रभावीपणे राबविण्याची सूचना त्यांनी केली.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिटच्या कामकाजाचाही आढावा यावेळी झाला. तपासण्यात आढळलेल्या रूग्णांना नियमित औषधोपचार दिला जात आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी दिली. आवश्यक ठिकाणी तपासणी मोहिम नियमितपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. बनावट डॉक्टर शोध व कारवाईचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

बैठकीला डॉ. विशाल काळे, डॉ. विद्या वाठोडकर, डॉ. प्रशांत घोडाम, पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, डॉ. नीलेश पाचबुद्धे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...