‘आपदा मित्रां’नी समाजाचे मित्र म्हणून काम करावे - निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके

 





‘आपदा मित्रांनी समाजाचे मित्र म्हणून काम करावे

- निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके

 

अमरावती, दि. 17: गावस्तरावर एखादी आपत्ती उद्भवल्यास त्या ठिकाणी मदत व जलद प्रतिसादाकरिता कार्य करण्यासाठी तसेच समुदायाला आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी आपदा मित्र यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. आपदा मित्रांनी आपत्ती काळात समाजाचे मित्र म्हणून काम करावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी आज येथे केले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात आयोजित आपदा मित्र कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी श्री. घोडके बोलत होते. विद्यापीठात 50 आपदा मित्रांच्या तिस-या बॅचच्या समारोप प्रसंगी सहायक जिल्हा सूचना अधिकारी मनीष फुलझेले, आपत्ती समन्वयक अमरजीत चौरपगार , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यावेळी उपस्थित होते.

आपदा मित्रांची आपत्तीमधील भूमिका याबाबत मार्गदर्शन करताना श्री. घोडके म्हणाले, कोणतीही आपत्ती आल्यास सर्वप्रथम आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. आपत्ती काळात जीवित व आर्थिक टाळण्यासाठी स्थानिकांची मदत घेणे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील चमूला सहकार्य करणे तसेच प्रसंगावधान राखणे गरजेचे आहे. आपदा मित्रांनी आपल्या प्रशिक्षणातून इतरांनाही प्रशिक्षित करावे. प्रत्येकाला स्वत:चा बचाव करण्यासाठी प्राथमिक प्रशिक्षण द्यावे. आपत्ती काळात वेळ ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. अशा काळात स्थानिक पातळीवर आपदा मित्रांमार्फत मदत मिळाल्यास जीवित व आर्थिक हानी टाळण्यास निश्चितच मदत होईल. आपदा मित्रांना शासनामार्फत पुढील प्रशिक्षणही लवकरच देण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

आपदा मित्रांनी यावेळी प्रशिक्षणाबाबत मनोगत व्यक्त केले. यामध्ये आपदा मित्रांची आपत्तीमध्ये भूमिका, शोध व बचाव कार्य कसे करावे, व्यवस्थापन, आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, सीपीआर कृत्रिम श्वासोच्छ्वास, पुरातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या पद्धती, यामध्ये उपलब्ध साधनसामुग्रीव्दारे बचावाची साधने तयार करणे, स्थानिकांची घ्यावयाची मदत, रस्ते अपघातात घ्यावयाची काळजी याविषयी योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्याचे सांगितले. या प्रशिक्षणामार्फत इतरांनाही प्रशिक्षित करु, अशी ग्वाही आपदा मित्रांनी यावेळी दिली.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून होत असलेल्या शोध बचाव कार्यात मदतीसाठी पुढाकार घेणा-या 300 आपदा मित्रांची निवड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे करण्यात आली आहे. युवक, विद्यार्थी व माजी सैनिकांचा त्यात समावेश आहे.  आपदा मित्रांचा तीन वर्षांसाठी पाच लाख रूपयांचा विमा शासनाकडून काढला जातो.

आपदा मित्रांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र व लाईफ गार्ड किट (लाईफ जॅकेट, फर्स्ट एड बॉक्स, सर्च लाईट, कटर, रोप आदी साहित्य) असलेले किट देण्यात आले. प्रशिक्षक म्हणून सोलापूर पथक तसेच  जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर, होमगार्ड, दिशा फाउंडेशन, अग्निशामक विभाग, सामान्य रुग्णालय व तज्ज्ञांची मदत झाली.

आतापर्यंत तीन बॅचेसमध्ये एकूण 110 आपदा मित्रांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित आपदा मित्रांनी आपले प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा शोध व बचाव पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षकांचे कार्य केले आहे. कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र रामेकर यांनी तर आभार गजानन वाढेकर यांनी मानले.

00000

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती