Thursday, November 9, 2017

जलयुक्त शिवार योजना राज्यासाठी वरदान
योजना अधिक व्यापक करण्यासाठी लोकसहभाग वाढवावा
-जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे
अमरावती, दि. 9 :  दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार अभियान वरदान ठरले आहे. यंदा अपु-या पर्जन्यमानाची झळ कमी करण्यात योजनेतील कामे महत्वपूर्ण ठरली. हे अभियान यापुढेही अधिक व्यापकपणे राबविण्यासाठी व लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे दिले.
चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा (म्हाली), रांजणा व नेकनामपूर या गावांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या बंधारे आदी कामांचे जलपूजन श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (रोहयो) डी. आर. काळे, उपविभागीय अधिकारी वनश्री लाभसेटवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, प्रताप अडसड, धानो-याच्या सरपंच भारती नरसेकर, चंद्रमणी गजभिये यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  
श्री. शिंदे म्हणाले की,  जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांना शाश्वत पाणी मिळण्यास मदत होत असून, कृषी उत्पादकतेत भर पडली आहे. हे अभियान यापुढे अधिक व्यापकपणे राबविण्यात येईल.  योजनेतील कामांचा लाभ घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाने शेतक-यांना सतत प्रोत्साहित केले पाहिजे.  योजनेतील कामांचा गुणात्मक दर्जा कायम राहिला पाहिजे. त्यामुळे कामातील गुणवत्ता न राखणा-या कंत्राटदारांवर कारवाईचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 धानोरा (म्हाली), रांजणा व नेकनामपूर या गावांतील साठवण बंधा-यांच्या कामांचे जलपूजन झाल्यानंतर  मंत्री महोदयांनी गावक-यांशी चर्चा करुन त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
धानोरा येथील बंधा-याची साठवण क्षमता 83 टीसीएम असून त्याचा गावातील शेतीला मोठा लाभ होणार आहे. विहीरींचे पुनर्भरण होऊन पेयजलाची उपलब्धताही राहणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फे देण्यात आली.  कार्यक्रमाला विविध विभागांच्या अधिकारी- कर्मचा-यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000









No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...