Thursday, November 30, 2017

एड्सग्रस्तांचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश
बाधित मातांची अपत्ये संक्रमणापासून सुरक्षित
          अमरावती, दि. 30 : तपासणी, योग्य उपचार व स्वयंसेवी संस्थांचे भक्कम सहकार्य यामुळे एचआयव्हीबाधित रुग्णांचे प्रमाण कमी करण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. सतत देखरेख व उपचार यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या बाधित 109 गर्भवती मातांची अपत्ये संक्रमणापासून सुरक्षित राहू शकली.  
 ‘राईट टू हेल्थ’ असे ब्रीद घेऊन एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिक जोरकसपणे राबवला जात आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, 2014-15 मध्ये तपासणी केलेल्या 83,501 रुग्णांपैकी 442, 2015-16 मध्ये 1 लाख 10 हजार 686 पैकी 390, 2016- 17 मध्ये 1, 14, 682 पैकी 381 रुग्ण बाधित असल्याचे आढळले. एप्रिल 2017 पासून आतापर्यंत तपासणी केलेल्या 68 हजार 912 रुग्णांपैकी 241 रुग्ण बाधित असल्याचे आढळले.
जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, सर्व उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, 39 खासगी दवाखाने व 5 रक्तपेढी यांच्या वतीने एड्सविषयी माहिती व तपासणीची विनामूल्य सुविधा देण्यात येते. जिल्हा रुग्णालयासह मोर्शी, अचलपूर, दर्यापूर, धारणी, वरुड, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, तिवसा येथे उपचार दिले जातात.  या वर्षात 21 बाधित मातांची शासकीय रुग्णालयांत यशस्वी प्रसुती करुन बाळाच्या सुरक्षिततेसाठी नेव्हीरॅपिन औषध देण्यात आले. ही सर्व मुले संक्रमणापासून सुरक्षित आहेत. 
          सीडी-4 या चाचणीवरुन रुग्णाची  प्रतिकारशक्ती व रोगाचे प्रमाण कळते. त्याविषयी बोलताना डॉ. सुयोगा देशपांडे म्हणाल्या की, पूर्वी या चाचणीत ठराविक प्रमाणानंतरच उपचार व्हायचे. आता मात्र सर्वांनाच उपचार केले जातात. बाधित रुग्णांना क्षयाचा धोका जास्त असतो. त्यामुळे ती तपासणीही तत्काळ होते. 
स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य
 स्वयंसेवी संस्थांचे भक्कम सहकार्य हा एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा महत्वाचा आधार असल्याचे डॉ. निकम यांनी सांगितले. ते म्हणाले की, भाग्योदय बहुउद्देशीय संस्था स्थलांतरित कामगारांसाठी, मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळातर्फे 100 गावांत तपासणी व समुपदेशन, ‘आधार’तर्फे एचआयव्हीबाधितांना सामाजिक, मानसिक व आर्थिक सहकार्य, श्रीशिवाजी शिक्षण संस्थेतर्फे ट्रकचालकांसाठी जागृती व तपासणी, तसेच ‘समर्पण’तर्फे तृतीयपंथी व्यक्तींसाठी जागृती, तपासणी व उपचारासाठी मदत केली जाते.


अतिजोखमीच्या क्षेत्रावर लक्ष
ट्रकड्रायव्हर, संत्रातोड कामगार, विशिष्ट काळासाठी स्थलांतरित होणा-या व्यक्ती यासह जोखमीच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जात आहे. अशा क्षेत्रात कॅम्प घेणे श्रेयस्कर ठरते. हे लक्षात घेऊन मोर्शी- वरुड परिसरात लवकरच मोठ्या तपासणी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती  कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी सांगितले.
रुग्णांची गोपनीयता राखण्यासाठी टोकन सिस्टीम
जिल्हा रुग्णालयातील एआरटी केंद्रात रुग्णांची गोपनीयता राखण्यासाठी टोकन सिस्टीम कार्यान्वित केली जात आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन उद्या (दि.1) सकाळी 11 वाजता होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली. त्याशिवाय, उद्या समाजकल्याण कार्यालयात 100 रक्तदान शिबिर आयोजकांचा सत्कार, दुपारी 3 वाजता समर्पणतर्फे प्रश्नमंजुषा, घोषवाक्य स्पर्धा,  राजकमल चौकात सायंकाळी 7 वाजता महारांगोळी व कलापथक होणार आहे.
दि. 2 डिसेंबरला रॅली  व विविध कार्यक्रम, दि. 3 ला समर्पणच्या कार्यालयात समलिंगी व्यक्तींसाठी डिफरन्ट ॲक्टिव्हिटी  कार्यक्रम होईल.  दि. 4 ला मोझरी येथे बाधित व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांच्या माहितीचा खास कार्यक्रम व स्नेहसंमेलन अनेक होणार आहे. दि. 6 ला विहानतर्फे बाधितांसाठी स्नेहसंमेलन व दि. 7 ला घरकामगारांसाठी भाग्योदयतर्फे चर्चासत्र होईल. त्याशिवाय, इतरही विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाभर केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
ढोले कुटुंबियांकडून 3 लाख रुपयांची देणगी
वरुड ग्रामीण रुग्णालयासाठी डॉ. सोनाली ढोले व त्यांच्या कुटुंबियांकडून 3 लाख रुपयांच्या देणगीतून 20 फाऊलर बेड भेट देण्यात आले. त्याबद्दल श्री. निकम यांनी डॉ. ढोले कुटुंबाचे सत्कार केला.


00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...