‘ग्रंथोत्सव 2017’परिवर्तनाला अनुकूल  समाजमन तयार
करण्याचे कार्य कवितेतून
-        ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके
अमरावती, दि. 20 : चांगले विचार पोहोचवत राहणे आणि  परिवर्तनाला अनुकूल समाजमन तयार करण्याचे काम कविता करत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा अ. भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी येथे केले.
जिल्हा ग्रंथालय कार्यालय, शिक्षण विभाग व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रंथोत्सव 2017’मध्ये आज श्री. डहाके यांची मुलाखत डॉ. रमेश अंधारे यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. डहाके यांनी कविता, समीक्षा, दृश्यकला व कलांविषयी मनमोकळेपणे उत्तरे दिली.  या मुलाखतीला शहर व जिल्ह्यातून वाचक-रसिक, विद्यार्थी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            श्री. डहाके म्हणाले की, कुठलीही क्रांती ताबडतोब होत नाही. कविता चांगले विचार सतत मांडून बदलाला अनुकुल अशी मनोभूमी तयार करत असते. कवीच्या म्हणण्याखेरीज इतरही अनेक कलांतून हे विचार पोहोचत असतात. कार्ल मार्क्सचा ‘दास कॅपिटल’ हे परिवर्तनाला चालना देणा-या पुस्तकाचे उदाहरण आहे. जनमानसात अस्वस्थता निर्माण करण्याबरोबरच मानसिक शांतता प्रदान करण्याचे कामही कविता करत असते. अमूक एक कविता श्रेष्ठ असे मी मानत नाही. समाज वेगवेगळ्या प्रवृत्तींचा असतो. तसे कवीही विविध प्रकारे लिहिणारे असतात.
ते पुढे म्हणाले की, शोषणव्यवस्थेविरुद्ध लिहिलेली प्रत्येक कलाकृती राजकीयच असते. मराठीत शरच्चंद्र माधव मुक्तिबोध यांची कविता व मर्ढेकर यांची ‘पाणी’ ही कादंबरी परिपूर्ण राजकीय जाणिवेची कृती आहे. विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्येची समूळ कारणे शोधत त्यावर एक भव्य पट असलेली कादंबरी लिहिता येणे शक्य आहे.  
ते पुढे म्हणाले की, वास्तव एकटे नसते. त्याला इतर अनेक पदर असू शकतात. ही जाणिव साहित्याइतकीच चित्रांतूनही प्रत्ययकारीपणे येते. सुधीर पटवर्धनांसारखे चित्रकार हे मांडत असतात. कलेच्या विविध प्रकारांतून अभिव्यक्ती होत असते. हे संचित लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा.
साठोत्तरी साहित्य व लघुअनियतकालिकांच्या चळवळीने वाङमयाला वळण दिले. आताही खेळ, नवाक्षरदर्शन, अतिरिक्त, ऐवजी अशी अनियकालिके उत्तमरीत्या निघत असतात. वाङमयीन पर्यावरणासाठी अशी नियतकालिके निघत राहणे गरजेचे आहे. हिंदीत तुलनेने अधिक पृष्ठसंख्येची दमदार नियतकालिके निघत असतात, असेही ते म्हणाले. मुलाखतीच्या अखेरीस त्यांनी सादर केलेल्या ‘प्रश्न’ या कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बन्सोड यांनी आभार मानले.
00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती