Wednesday, November 1, 2017

ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून अमरावतीत अवयवदान शक्य
अमरावती, दि. 05 :  येथील ब्रेन डेड म्हणून घोषित झालेल्या एका व्यक्तीचे अवयवदान करण्याचा त्याच्या कुटुंबीयांनी केलेला संकल्प आज ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या माध्यमातून पूर्ण होऊ शकला.
          हमालपुरा येथील रहिवाशी मनोज गुप्ता यांना प्रारंभी जिल्हा सामान्य रुग्णालयात व तद्नंतर डॉ. अविनाश चौधरी यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.  तथापि, ते ब्रेन डेड झाल्याने डॉ. चौधरी यांनी  गुप्ता यांच्या परिवाराला अवयवदान प्रक्रियेविषयी माहिती दिली. सामाजिक भान जोपासत गुप्ता कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे स्व. गुप्ता यांची किडनी, यकृत व डोळे हे अवयव गरजू रुग्णांना मिळू शकतील.     
ब्रेनडेड अवस्थेतील मनोज गुप्ता यांचे यकृत व मूत्रपिंड बुधवारी  एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला पाठविण्यात आले व नेत्रपटल सुरक्षित ठेवण्यात आले आहे. मुंबई व नागपूर येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार  ही शस्त्रक्रिया पार पडली. अवयव मुंबईला पाठविण्यासाठी खापर्डे बगिचा येथील चौधरी रुग्णालयापासून ते विमानतळापर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आला.  शस्त्रक्रियेनंतर एअर ॲम्ब्युलन्सने स्व. गुप्ता यांचे यकृत ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल, तर मूत्रपिंड मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलला पाठविण्यात आले.
मुंबई येथील डॉ. गौरव चौबे, नागपूरचे डॉ. सुशीलकुमार दुबे व डॉ. पिंकी थापर, डॉ. सोमनाथ चट्टोपाध्याय आदींनी शस्त्रक्रियेत सहभाग घेतला. अवयवदान हे सामाजिक हितासाठी महत्वाचा निर्णय असून, गुप्ता कुटुंबीयांनी समाजापुढे आदर्श ठेवला असल्याची प्रतिक्रिया डॉ.  अविनाश चौधरी यांनी व्यक्त केली.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...