जिल्ह्यात 1 ऑक्टोबरपासून ‘क्लीन इंडिया’ कार्यक्रम

 







‘आझादी का अमृत महोत्सवा’चे औचित्य

जिल्ह्यात 1 ऑक्टोबरपासून ‘क्लीन इंडिया’ कार्यक्रम

विविध संस्था व नागरिकांचा सहभाग मिळवावा

-          निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल

 

अमरावती, दि. 30 : केंद्रिय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, तसेच नेहरू युवा केंद्रातर्फे  ‘आझादी का अमृत महोत्सवा’निमित्त 1 ते 31 ऑक्टोबरदरम्यान विविध संस्थांच्या सहभागासह ‘क्लीन इंडिया’अंतर्गत जिल्ह्यात गावोगाव सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, तसेच प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी विविध संस्था व नागरिकांचा अधिकाधिक सहभाग मिळवावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी आज येथे केले.

कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सहायक रोजगार संचालक प्रफुल्ल शेळके, जिल्हा रूग्णालयाचे डॉ. अमोल नरोटे, नेहरू युवा केंद्राचे सदस्य शरद गढीकर, जयंत डेहणकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी गीता वंजारी, नेहरू युवा केंद्राच्या समन्वय अधिकारी स्नेहल बासुतकर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, आयटीआयच्या प्राचार्य मंगलाताई देशमुख, खादी ग्रामोद्योग मंडळाचे मंगेश वानखडे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव, प्रदीप सूर्यवंशी, ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने आदी यावेळी उपस्थित होते.

या मोहिमेत स्वच्छतेबरोबरच प्लास्टिक निर्मूलनावर भर देण्यात येणार आहे. पर्यटनस्थळे, शैक्षणिक परिसर, बसस्थानक, रेल्वेस्थानक, महामार्ग, धार्मिक स्थळे, रुग्णालये, जलस्त्रोत, ऐतिहासिक स्थळे आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. गावांचे सौंदर्यीकरणही मोहिमेतून साधले जाणार आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून मोहिम राबवण्यात येईल. घरोघरी जाऊन कचरा- विशेषत: प्लास्टिक गोळा करण्यात येणार आहे. तसेच गावागावातील  युवक तसेच महिला मंडळ व स्वयंसेवी संस्थांमार्फत स्वच्छता करण्यात येईल. नेहरू युवा केंद्राच्या युवक युवतींचा त्यात सक्रिय सहभाग असेल.

या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग मिळवावा व सर्व विभागांनी समन्वयाने ही मोहिम राबवावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिका-यांनी दिले.

                        000

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती