पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून द्यावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताहाची अंमलबजावणी

पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून द्यावा

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

   अमरावती, दि. 1 : जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सप्ताह राबविण्यात येत असून, अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रे, तसेच सर्व सेवा कार्यक्षेत्रांच्या माध्यमातून अधिकाधिक जनजागृती करून ही योजना सर्वदूर पोहोचविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना शहरी व ग्रामीण भागात लागू करण्यात आली आहे. योजनेत 1 जानेवारी 2017 रोजी किंवा त्यानंतर पहिल्यादा ज्या मातांची प्रसूती झाली आहे, किंवा पहिल्यावेळी ज्या मातेस गर्भधारणा झाली असेल किंवा त्यांना शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल, अशा पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ जिवित अपत्यासाठी देण्यात येतो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला एकूण पाच हजार रूपयाचा लाभ त्याच्या बँक खात्यावर देण्यात येतो. लाभ देण्याचे एकूण तीन टप्पे असून पहिला टप्पा एक हजार रूपये असून, मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर देण्यात येतो. दुसरा टप्पा दोन हजार रूपये असून किमान एकदा  प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या सहा महिने पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो. तिसरा टप्पा दोन हजार रूपये प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व 14 आठवड्याच्या आत लसीकरण पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो. ही योजना शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे.

 प्राथमिक आरोग्य आणि सर्व सेवा कार्यक्षेत्रांमध्ये माहितीपत्रकांचे वाटप होणार आहे. तसेच जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ  देण्‍यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर यांनी दिली.जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पवनित कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक  शामसुंदर निकम यांनी केले आहे.

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती