जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न यापुढे कायम एकोपा व शांतता राखण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 



संचारबंदीत सवलत

जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न

यापुढे कायम एकोपा व शांतता राखण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १९ : अमरावती शहरात संचारबंदीत शिथिलता आली असून, जनजीवन पूर्वपदावर येत आहे. स्थैर्य व शांतता विकासाला बळ देतात. परिस्थितीत तणाव निर्माण झाला की विकासाला खीळ बसते व सर्वांचेच नुकसान होते. त्यामुळे यापुढे कधीही एकोपा व शांतता भंग होऊ नये, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

अमरावती शहरात कायदे व सुव्यवस्था राखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावती शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन काही वेळेसाठी संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू, कृषी सेवा केंद्र, विद्यार्थी, बँका यांना काही वेळेसाठी सवलत देण्यात आली होती.

पुढे विविध परीक्षा सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना सोयीसाठी, तसेच नागरिकांना आवश्यक जीवनावश्यक वस्तूंसाठी सवलत देणे आवश्यक होते. त्यानुसार पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी संचारबंदीत सूट देण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

त्यानुसार दि. २० नोव्हेंबरपासून रोज सकाळी ९ ते  सायंकाळी ६ दरम्यान सवलत देण्यात आली आहे. सायंकाळी ६ ते सकाळी ९ पर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे.

गत काही दिवसांपूर्वी शहरात निर्माण झालेला तणाव, काही अनुचित घटना लक्षात घेऊन पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी स्वतः शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन शांततेचे आवाहन केले. अनेक मान्यवरांना सोबत घेऊन त्यांनी परिस्थितीचा सातत्यपूर्ण आढावा घेतला व  शांतता प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्न केले.

अमरावती हे सांस्कृतिक महत्त्व असलेले, तसेच नवनव्या प्रकल्पांच्या उभारणीमुळे विकासाकडे झेपावणारे औद्योगिक शहर आहे. विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी शांतता व स्थैर्य कायम राहणे आवश्यक आहे. त्यामुळे

यापुढेही शहरात कायम शांतता नांदावी. यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

०००

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती