बंधुभाव आणि कायद्याचा सन्मान राखा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 




बंधुभाव आणि कायद्याचा सन्मान राखा

-   जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 15 : कायदा हातात न घेता बंधूभाव ठेवून शांतता प्रस्थापित करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सलोख्यासाठी अनेक नागरिक योगदान देत आहेत. यापुढेही असाच बंधुभाव कायम राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी परतवाड्यात केले.

    

जिल्हाधिकारी  पवनीत कौर यांच्या उपस्थितीत परतवाडा पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय राजस्व अधिकारी संदीपकुमार अपार, ठाणेदार संतोष टाले, नायब तहसीलदार अक्षय मांडवे, माजी नगराध्यक्ष रफिक सेठ, रुपेश ढेपे,सल्लुभाई आदी उपस्थित होते.

 

            जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने सजग असणे आवश्यक आहे. यापूर्वीच्या काही घटनांबाबत समाजमाध्यमांद्वारे प्रसृत होणारे संदेश विश्वासार्ह नसतात. अनेकवेळा असे संदेश समाजकंटकांकडून द्वेष वाढविण्यासाठी प्रसारित केले जातात. त्यामुळे जागरूक राहून बंधुभाव कायम ठेवावा.

 

 त्या पुढे म्हणाल्या की, समाजात अनेक चांगल्या गोष्टीही घडत असतात. मात्र, समाजकंटकांकडून त्या कधीही पुढे आणल्या जात नाहीत. त्यामुळे आपण त्या चांगल्या गोष्टींचा प्रसार केला पाहिजे. लोकांमध्ये एकमेकांविषयी प्रेमाच्या भावना आहेत. अमरावती शहरातील काही अनुचित घटनांनंतर ग्रामीण भागात व इतर ठिकाणी लोकांनी व प्रशासनाने शांतता राखली हे प्रशंसनीय आहे. सर्व धर्मांच्या नागरिकांमध्ये सलोखा आहे. मुस्लीमांनी शिवमंदिर तर हिंदुनी मशिदीचे संरक्षण केल्याच्या घटना सर्वधर्म समभावाच्या संदेश देणाऱ्या आहेत. गावात कुठलीही अनुचित घटना होण्याआधी आपण प्रत्येकाने समाजापर्यत एकतेचा संदेश देत अनुचित बाबी  टाळाव्यात. कुणीही कायदा हातात घेऊ नये अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.  यावेळी जिल्हाधिका-यांनी धावत्या दौ-यातून परतवाडा -अचलपूर शहरातील विविध ठिकाणांना भेट दिली व विविध मान्यवरांशी संवाद साधला. 

 

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती