महिला सक्षमीकरणासाठी समाजात नव उद्योजिका निर्माण होणे गरजेचे - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 


-     






महिला सक्षमीकरणासाठी समाजात

नव उद्योजिका निर्माण होणे गरजेचे

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

* दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रात महिला वसतिगृहाचे उद्घाटन तसेच महिला उद्योजक कार्यशाळा संपन्न

 

अमरावती, दि. 22 : आज सर्वच क्षेत्रात महिलांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. महिला उद्योजक म्हणूनही जिल्ह्यातील अनेक महिलांना राष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील अन्य महिलांनाही प्रोत्साहन देऊन नव उद्योजिका निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले. दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रातील महिला वसतिगृहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला उद्योजक कार्यशाळाही घेण्यात आली.

दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. के.ए. धापके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित प्रगतीशील शेतकरी पुर्निमा सवाई, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख, आत्माच्या अर्चना निस्ताने आदी यावेळी उपस्थित होते.

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देत श्रीमती कौर म्हणाल्या की, कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेऊन उद्योग चालविणाऱ्या महिलांचे उत्पादन अतिशय सुंदर आहे. या उत्पादनाला विक्री व्यवस्थापनाची जोड देणे आवश्यक आहे. यासाठी महिलांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होणे गरजेचे आहे. यादृष्टीने लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. के.ए. धापके म्हणाले की, दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रामार्फत विविध प्रशिक्षण देण्यात येते. येथे सुरु करण्यात आलेल्या महिला वसतिगृहामुळे या प्रशिक्षणाला अधिक चालना मिळून अधिकाधिक महिलांना त्याचा लाभ मिळेल. आपल्या जिल्ह्यात संत्री मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतात. परंतू संत्री रस साठवून ठेवण्यासाठी अनेक अडचणी आहेत. त्यासाठी महिला उद्योजकांनी छोट्या स्टॉलवरुन संत्रा रसाची त्वरित विक्री करता येईल अशी व्यवस्था निर्माण केल्यास बाजारपेठेत या पेयाला चांगली मागणी निर्माण होऊ शकते.

अनेक क्षेत्राप्रमाणे शेती व्यवसायातही महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. कृषीवर आधारित उद्योग वाढविण्यासाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्याचा लाभ महिला उद्योजकांनी घ्यावा. या योजनांचा लाभ वैयक्तिक किंवा गटाच्या माध्यमातूनही घेता येतो. अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सबसीडीही उपलब्ध आहे, असे सांगून अनिल खर्चान यांनी उपस्थित महिला उद्योजकांना विविध योजनांची माहिती दिली. महिलांनी वस्तूंच्या विक्रीचे कौशल्य आत्मसात करुन उद्योगाची उभारणी केल्यास उद्योग निश्चितच यशस्वी होईल, असे श्री सोसे यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात बचत गट महिला उत्पादन कंपनीसाठी व्यापारी केंद्र उभारण्याचे शासनस्तरावर प्रस्तावित आहे. त्यातून विक्री व्यवस्था निर्माण झाल्यास उद्योगांना निश्चितच चालना मिळेल, असे श्री देशमुख यावेळी म्हणाले. महिला उद्योजक आरती शेंडे, शोभा डवरे, रुपाली कापसकर, किरण लोहकरे, मनिषा टवलार यांनी आपल्या व्यवसायाची माहिती देऊन या क्षेत्रातील आव्हाने आणि अडचणींबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.

कृषी विज्ञान केंद्रातील साधना रेडिओ, बीज प्रक्रिया, बीज परीक्षण, माती-पाणी परीक्षण, सेंद्रिय खते निर्मिती केंद्र आदींची जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहाणी केली.

कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन गृह विज्ञान विषय विशेषज्ञ डॉ. अर्चना काकडे यांनी मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती