Friday, May 31, 2024

अमरावती जिल्ह्यात जिल्हा निर्यात कक्ष स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल

 


अमरावती जिल्ह्यात जिल्हा निर्यात कक्ष स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल

अमरावती, दि. 31 (जिमाका): अमरावती जिल्ह्यात जिल्हा निर्यात कक्ष स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असून जिल्ह्यासाठी एक्सपोर्ट हब इनिशिएटिव्ह अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. अमरावती विभागातील डीआयसी अधिकाऱ्यांसाठी डीजीएफटी आरए नागपूरद्वारे निर्यात प्रक्रिया या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 

      जिल्हाधिकारी सौरभ कटियार  यांच्यासह अपर महानिदेशक विदेश व्यापार स्नेहल ढोके यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल होती. परकीय व्यापार महासंचालनालय, नागपूर, पोस्ट विभाग, अपेडा (कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण), बँक ऑफ महाराष्ट्र, एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय), फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनआणि  एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमात डीजीएफटी चमूच्या वतीने कार्यकारी अधिकारी निखील पाटील,  गौरव शहारे , तरुण व्यावसायिक ध्रुव पारीक उपस्थित होते. डीजीएफटी नागपूरच्या चमूने निर्यात कशी करावी, वित्तीय भाग, कस्टमची प्रक्रिया, आयईसीची नोंदणी, डीजीएफटी योजनांचा लाभ कसा घ्यावा आणि अन्य बाबींविषयी सविस्तर माहिती दिली.

 

        येत्या काही दिवसांत डीजीएफटीतर्फे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा निर्यात कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या जिल्हा निर्यात कक्षामध्ये स्थानिक नागरिकांना निर्यातीसंदर्भातील संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली जाणार असून जिल्ह्याची निर्यात वाढविण्यात जिल्हा निर्यात कक्षाचे मोठे योगदान राहणार आहे.

000

 

 

मतमोजणी परिसरात 4 जून रोजी 144 कलम लागू

 

 

मतमोजणी परिसरात 4 जून रोजी 144 कलम लागू

          अमरावती, दि. 31 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअनुषंगाने 07-अमरावती लोकसभा मतदारसंघा 26 एप्रिल 2024 रोजी मतदान झाले. मतमोजणी दि. 4 जून 2024 रोजी लोकशाही भवन, विद्यापीठ रोड, अमरावती येथे होणार आहे.

 

          त्यानुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले असल्याचे आदेशात नमुद केले  आहे.

 

          मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालय उमेदवारांचे मंडप, मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रांझीस्टर, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश प्रतिबंध करण्यात आला आहे. सदरील आदेश निवडणुकीची कामे हाताळतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून दि. 4 जूनच्या मध्यरात्रीपासून ते मतमोजणीची प्रक्रीया संपेपर्यंत अंमलात राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी कळविले आहे.

0000

Thursday, May 30, 2024

मतमोजणीसाठी बियाणी चौक ते तपोवन वाहतूक मार्गात बदल

 

मतमोजणीसाठी बियाणी चौक

ते तपोवन वाहतूक मार्गात बदल

 

         अमरावती, दि.30 (जिमाका) : लोकसभा निवडणूकीची मतमोजणी 4 जून रोजी बियाणी चौक ते तपोवन गेट मार्गावर असलेल्या लोकशाही भवनात होणार आहे. वाहतुकीची कोंडी अथवा कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, म्हणून सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरची वाहतूक पर्यायी मागाने वळविण्यात येणार आहे. अशी माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांनी कळवली आहे.

हे मार्ग बंद असतील

     बियाणी चौक ते तपोवन गेट हा मार्ग सर्व प्रकारांच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी 4 जूनच्या सकाळी 6 वाजतापासून ते मतमोजणी प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे.

हे असतील पर्यायी मार्ग

              मार्डी मार्गे येणार तसेच तपोवन गेट परिसरातील निवासी वसाहतील वाहन चालकांना अमरावती शहरात येण्याकरीता पर्यायी मार्ग: विद्यापीठ चौक, रचना सृष्टी, विक्रांत लॉन, दंत महाविद्यालय, वडाळी ओवरब्रिज चौक, अंधविद्यालय, चपराशीपूरा या मार्गाचा अवलंब करावा.

बियाणी चौक येथून मार्डी रोडकडे तसेच तपोवन परिसरातील निवासी वसाहतीत जाणाऱ्या वाहन चालकांना पर्यायी मार्ग: बियाणी चौक, चपराशीपूरा, अंधविद्यालय, वडाळी ओवरब्रिज चौक, दंत विद्यालय, विक्रांत लॉन, रचना सृष्टी, विद्यापीठ चौक.

       बियाणी चौक ते विद्यापीठ चौक मार्गावरील नागरी वस्ती चिलम छावणी, व्यंकय्यापूरा, जिजाऊ नगर, ओम कॉलनी येथील वाहन चालकांना मुख्य मार्गावर प्रवेश बंद राहणार असल्याने त्यांनी परिसरातील उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करावा.

      फक्त शिवनेरी कॉलनी, पंकज कॉलनी, परिसरातील रहिवासी नागरिक व या मार्गावरील कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग कार्यालयातील कर्मचारी यांना पर्यायी मार्ग नसल्याने त्यांनी आपले वाहनाने कार्यालय व निवास्थानी जाण्या-येण्यासाठी बियाणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा. तसेच फक्त उत्कर्ष कॉलनी, पोस्टल कॉलनी, एच. पी. गॅस गोडाऊन, कोषागार कार्यालय, प्रबोधीनी, कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, पशुसंवर्धन कार्यालय, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, महाबिज कर्मचारी यांनी पर्यायी मार्ग नसल्याने त्यांनी आपले वाहनाने कार्यालय व निवास्थानी जाण्या-येण्यासाठी विद्यापीठ चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा. सुट देण्यात आलेले निवासी नागरिक यांनी सोबत रहिवास पुरावा तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र सोबत बाळगावे. तसेच आवश्यक वेळीस वाहनांचा वापर करावा. सदर आदेश, अधिसुचनेचे जो कोणी वाहनचालक पालन करणार नाही त्यांचे विरूध्द मोवाका 1988 व महराष्ट्र पोलीस कायदा 1951 अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर व वाहतुक विभाग, अमरावती शहर कडून सर्व नागरिकांना याव्दारे जाहीर आवाहन करण्यात येते की, आदेशात नमुद निर्बंधाचे सर्व वाहन चालकांनी काटेकोरपणे पालन करून पोलीस विभागास आवश्यक सहकार्य करावे. 

0000

लोकशाही भवन येथे लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी * जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला आढावा

 









लोकशाही भवन येथे लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी

* जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला आढावा

 

          अमरावती, दि. 30 (जिमाका): 07- अमरावती लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीसाठी लोकशाही भवन परिसरात जय्यत तयारी केली जात असून सुरक्षितेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन दक्ष आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज प्रत्यक्ष लोकशाही भवनला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राची पाहणी व सुरक्षिततेचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

          दि. 26 एप्रिल 2024 रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी दि. 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून लोकशाही भवन, विद्यापीठ रोड, अमरावती येथे सुरु होणार आहे. 07-अमरावती लोकसभा मतदार संघात एकूण 6 विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 18 टेबल याप्रमाणे 108 टेबल मतमोजणीसाठी लावण्यात येणार आहे. तसेच पोस्टल बॅलेट पेपर मतमोणीसाठी 10 टेबल व इटीपीबीएमएस स्कॅनिंग साठी 8 स्कॅनर लावण्यात येणार आहेत.

          मतमोजणीसाठी प्रत्येक मतदार संघनिहाय 18 टेबलवर 18 मतमोजणी पर्यवेक्षक व 18 मतमोजणी सहायक तसेच सुक्ष्म निरीक्षक 18, शिपाई 18 याप्रमाणे एकूण 6 मतदार संघासाठी 108 मतमोजणी पर्यवेक्षक व 108 मतमोजणी सहायक, सुक्ष्म निरीक्षक 108, शिपाई 108 याप्रमाणे 432 कर्मचारी मतदान कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच इतर कामासाठी 500 कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी 500 असे एकूण 1500 कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी हॉलमध्ये इव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीसाठी 108 व इटीपीबीएस व पोस्टल बॅलेट पेपर मतमोजणीसाठी 10 प्रतिनिधी असे एकूण 118 प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधीसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

          37-बडनेरा विधानसभा मतदार संघासाठी 337 मतदान केंद्र असून मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या होणार आहे. 38- अमरावती विधानसभा मतदार संघासाठी 322 मतदान केंद्र असून मतमोजणीच्या एकूण 18 फेऱ्या होणार आहे. 39-तिवसा विधानसभा मतदार संघासाठी 319 मतदान केंद्र असून मतमोजणीच्या एकूण 18 फेऱ्या होणार आहे. 40-दर्यापूर विधानसभा मतदार संघासाठी 342 मतदान केंद्र असून मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या होणार आहे. 41-मेळघाट विधानसभा मतदार संघासाठी 309 मतदान केंद्र असून मतमोजणीच्या एकूण 18 फेऱ्या होणार आहे. 42-अचलपूर विधानसभा मतदार संघासाठी 354 मतदान केंद्र असून मतमोजणीच्या एकूण 20 फेऱ्या होणार आहे. असे एकूण सहा विधानसभा मतदार संघासाठी एकूण 1 हजार 983 मतदान केंद्र असून 112 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत.

          मतमोजणीसाठी मतमोजणी हॉलमध्ये कम्युनिकेशन कक्ष, मीडिया कक्ष, उमेदवार कक्ष स्थापन केलेला असून सर्व कक्ष सुसज्ज आहेत. वीज पुरवठा अखंड सुरु राहावा यासाठी युपीएस व जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरीक्षणाखाली संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पडणार आहे.

 

07- अमरावती लोकसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी

 

07- अमरावती लोकसभा मतदार संघाचे मतदान दि. 26 एप्रिल 2024 रोजी झालेल्या मतदानानुसार 37- बडनेरा मतदारसंघात एकूण 3 लक्ष 38 हजार 079 मतदार असून 1 लक्ष 88 हजार 594 मतदार झाले आहे. या मतदानाची टक्केवारी 55.78 टक्के एवढी झाली आहे. 38- अमरावती मतदारसंघात एकूण 3 लक्ष 46 हजार 416 मतदार असून 1 लक्ष 99 हजार 242 मतदार झाले आहे. या मतदानाची टक्केवारी 57.52 टक्के एवढी झाली आहे. 39-तिवसा मतदारसंघात एकूण 2 लक्ष 84 हजार 256 मतदार असून 1 लक्ष 82 हजार 313 मतदार झाले आहे. या मतदानाची टक्केवारी 64.14 टक्के एवढी झाली आहे. 40-दर्यापूर मतदारसंघात एकूण 2 लक्ष 99 हजार 620 मतदार असून 2 लक्ष 003 हजार 84 मतदार झाले आहे. या मतदानाची टक्केवारी 66.88 टक्के एवढी झाली आहे. 41-मेळघाट मतदारसंघात एकूण 2 लक्ष 86 हजार 890 मतदार असून 2 लक्ष 05 हजार 284 मतदार झाले आहे. या मतदानाची टक्केवारी 71.55 एवढी झाली आहे. 42-अचलपूर मतदारसंघात एकूण 2 लक्ष 80 हजार 817 मतदार असून 1 लक्ष 93 हजार 304 मतदार झाले आहे. या मतदानाची टक्केवारी 63.67 एवढी झाली आहे. असे एकूण 18 लक्ष 36 हजार 078 मतदार असून 11 लक्ष 69 हजार 121 मतदार झाले आहे. या मतदानाच एकूण टक्केवारी 63.67 टक्के एवढी आहे.

0000

 

Wednesday, May 29, 2024

महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या पीक निहाय वाणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या पीक निहाय वाणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            अमरावती, दि. 29 (जिमाका): खरीप हंगाम 2024 साठी राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य अंतर्गत सोयाबीन पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण व राष्ट्रीय अन्न पोषण सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत तुर, मुग, उडीद पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण ह्या बाबी राबविण्यात येत आहेत. या बाबींच्या लाभासाठी लाभार्थ्यांने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांने अर्ज करत असतांना जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेल्या वाणाकरीताच अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेले पीकनिहाय वाणाचा तपशील:

            सोयाबीन पीकासाठी पीडीकेव्ही अंबा, सुवर्ण सोया, फुले संगम, एनआरसी-130, जेएस-2034, एमऐयुएस-612, जेएस-20-116 फुले किमया, फुले दुर्वा वाण उपलब्ध आहे. तुर पिकासाठी बीडीएन -716, जीआरजी-152(भीमा), तर 10 वर्षावरील वाण आशा, मारोती, पीकेव्ही तारा, फुले राजेश्र्वरी उपलब्ध आहे. मुग पीकासाठी उत्कर्षा हे वाण तर दहा वर्षावरील वाण बीएम-2003-2, पीकेव्ही-एकेएम-4 उपलब्ध आहे. तसेच उडीद पीकासाठी एकेयु-10-1 वाण उपलब्ध आहे.  वरीलप्रमाणे उपलब्ध असलेल्या सोयाबीन वाणाच्या बियाण्यास पीक प्रात्यक्षिकाअंतर्गत रूपये 4 हजार प्रति क्विंटल व प्रमाणित बियाणे वितरण या बाबीअंतर्गत रूपये 2 हजार प्रति क्विंटल या प्रमाणे अनुदान देय आहे. तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबीअंतर्गत तुर, मुग व उडीद बियाण्याच्या 10 वर्षाआतील वाणास रूपये 5 हजार प्रति क्विंटल व 10 वर्षावरील वाणास रूपये 2 हजार 500 प्रति क्विंटल याप्रमाणे अनुदान देय असून पीक प्रात्यक्षिकाअंतर्गत तुर, मुग व उडीद 10 वर्षाआतील वाणाच्या बियाण्यास 100 टक्के अनुदान देय राहील.

            अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, या घटकासाठी शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार आहे. तरी सर्व शेतकरी बंधू व भगिनींनी महाडीबीटी पोर्टलवर वरील घटकाअंतर्गत उपलब्ध असलेल्या पीकनिहाय वाणासाठी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

000000

Tuesday, May 28, 2024

जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

 


जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

 

            अमरावती, दि.२८ (जिमाका): स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.

            यावेळी उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार, राजेश्‍वर हांडे, तेजस्विनी कोरे, तहसिलदार रवींद्र कानडजे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प  अर्पण करुन अभिवादन केले.

 

00000

 

Monday, May 27, 2024

आंबा व मिलेट्स महोत्सव संपन्न चार दिवसीय आंबा व मिलेट्स महोत्सवाला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 


आंबा व मिलेट्स महोत्सव संपन्न

 

चार दिवसीय आंबा व मिलेट्स महोत्सवाला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

          अमरावती, दि. 27 (जिमाका): महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालयमार्फत जाधव पॅलेस बडनेरा रोड येथे आंबा व मिल्लेट्स महोत्सवाचे उद्घाटन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाले आहे. या महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम विभागीय सहनिबंधक शंकर कुंभार, सहायक निबंधक श्री .उल्हे, कार्यकारी अभियंता सुनिल राठी, विजय जाधव तसेच पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक दिनेश डागा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हापूस, केशर व विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित इतर आंबा थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावेत तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर या सारख्या मिलेट्सपासून तयार होणारी उत्पादने व कृषी माल उत्पादने यांच्या करिता थेट ग्राहक उपलब्ध व्हावे या उद्येशाने या चार दिवसीय आंबा व मिलेट्स महोत्सवाला अमरावतीकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

            आंबा व मिलेट्स महोत्सव हा चांगला उपक्रम असून असे उपक्रम नियमित घेत रहावे, असे विभागीय सहनिबंधक शंकर कुंभार यांनी सांगितले. यावेळी स्टॉल धारकांनी आपले मनोगत व्यक्त केले .  चार दिवसात स्टॉल धारकांकडून साधारणतः पंचवीस लाखांची विक्री करण्यात आली. भविष्यात आपली विक्री वाढविण्याच्या दृष्टीने ग्राहक व स्टॉल धारक यांचा संपर्क वाढला. भविष्यात आणखी मोठे महोत्सव आयोजनाबाबत प्रयत्न करू जेणेकरून आंबा व इतर फळबाग मिलेट्स उत्पादने लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल व उद्योग तसेच रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल, असे पणन मंडळाकडून सांगण्यात आले.

0000

 

Friday, May 24, 2024

महाडीबीटी पोर्टलवरील विविध योजनेसंदर्भातील सूचना महाविद्यालयाच्या माहिती पुस्तिकेत समावेश करा - समाजकल्याण विभागाचे आवाहन

 

महाडीबीटी पोर्टलवरील विविध योजनेसंदर्भातील सूचना महाविद्यालयाच्या माहिती पुस्तिकेत समावेश करा

- समाजकल्याण विभागाचे आवाहन

 

           अमरावती, दि. 24 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी शिष्यवृत्ती व अन्य योजनांचा लाभ ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे दिला जातो. या योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी व त्याचा लाभ शैक्षणिक वर्षातच मिळावा यासाठी राज्य शासनाने महाविद्यालयस्तरावर प्रसिध्दी होणाऱ्या प्रवेश प्रक्रीयेच्या माहिती पुस्तीकेत समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार सर्व महाविद्यालयानी शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या प्रवेश प्रक्रीयेपुर्वीच्या सर्व प्रसिध्दी होणाऱ्या माहितीपुस्तीकेत समावेश करावा, असे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त माया केदार यांनी केल आहे.

 

          सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना व व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात. 

 

           योजनाअंतर्गत वर्षाला सरासरी सुमारे साडेचार ते पाच लाख अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करून योजनेचा लाभ घेत आहे. संबंधित महाविद्यालये अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर देखील अगदी शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीकृत करत नाहीत. अंतत: विद्यार्थी शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती पासून वंचित राहतो. ही बाब केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली तसेच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशनास आली. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून विविध शिष्यवृत्या फ्रीशिप, विद्यावेतन योजनांकरीता महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करावयाची प्रक्रीया ही त्या त्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतील एक भाग असून महाविद्यालयांनी त्याच वर्षाच्या प्रवेश प्रक्रीयेमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज राज्य शासनाच्या महाडीबीटीवर पोर्टलवर नोंदणीकृत करणे आवश्यक असल्याचे धोरण राज्य शासनाने निश्चित केलेले आहे. त्यानुसार जिल्हातील सर्व महाविद्यालयानी व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्यांचा लाभ देण्याकरिता संबंधित शिष्यवृत्ती योजनेच्या निकषानुसार राज्य शासनाच्या  https://mahadbtmahait.gov.in या महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करण्यात यावी. तसेच महाविद्यालयास्तरावरून प्रसिध्दी होणाऱ्या प्रवेश प्रक्रीयेच्या माहिती पुस्तीका ऑनलाईन अर्ज व संबंधित वेबसाईट पोर्टल, मोबाईल ॲपव्दारे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याच्या सुचना द्यावी. तसेच समान संधी केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याबाबात मार्गदर्शन करण्यात यावे.

 

              अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ होण्यासाठी राज्य शासनाच्या धोरणानुसार सर्व महाविद्यालयानी शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या प्रवेश प्रक्रीयेपुर्वीच्या सर्व प्रसिध्दी होणाऱ्या माहितीपुस्तीकेमध्ये खालील बाबीचा समावेश करावा.

1.         प्रवेश निश्चित झालेल्या अनुसूचित जाती व विविध मागास प्रर्वगातील तसेच आर्थीक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्त्या किंवा फ्रिशिप इत्यादी योजनांकरीता राज्य शासनाच्या https://mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर जाऊन योजनेच्या निकषानुसार ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करणे आवश्यक आहे.

2.         ऑनलाईन शिष्यवृत्या किंवा फ्रिशिपकरीता विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रीयेव्दारे निर्धारित केलेल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी अंतिम प्रवेश घेतलेल्या तारखेपासून पुढील एक महिन्याच्या आत महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृती किंवा फ्रिशिपकरीता परीपुर्ण अर्ज करणे आवश्यक आहे.

वरील बावी सर्व महाविद्यालयानी आपल्या शैक्षणिक वर्षात प्रसिध्दी होणाऱ्या माहिती पुस्तीकेमध्ये समावेश करण्यासंदर्भात पत्राव्दारे सूचना देण्यात आले आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.

00000

आंबा व मिलेट महोत्सवाचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते उद्घाटन; नागरिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा- सौरभ कटियार

 







आंबा व मिलेट महोत्सवाचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते उद्घाटन;

नागरिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा- सौरभ कटियार

 

        अमरावती, दि. 24 (जिमाका) : राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने आंबा व मिलेट महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे  आयोजन जाधव पॅलेस येथे करण्यात आले. या महोत्सवामध्ये आंब्याच्या विविध प्रजाती तसेच मिलेटचे विविध प्रकार प्रदर्शनीत ठेवण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा व मिल्लेट्स पदार्थांचे नागरिकांने  लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

 

            जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा आणि आंबा प्रेमींना विविध प्रजातींच्या आंब्याची चव चाखता यावी. तसेच तृणधान्यांमध्ये असलेले पोषक घटक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असून त्यांचा लाभ ग्राहकांना मिळावा यासाठी जाधव पॅलेस येथे रविवार दि. 26 मेपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत आंबा व मिलेट महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कोकणचा अस्सल हापूस आंबा, केशर आंबा, मिलेट ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई,राळा, भगर इत्यादी धान्य आणि त्यापासून तयार करण्यात येणारा ज्वारीचा रवा, बिस्कीट इत्यादी नाविन्यपूर्ण उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदीची संधी ग्राहकांना मिळाली आहे, अशी माहिती पणन मंडळ उपसरव्यवस्थापक दिनेश डागा यांनी दिली.

 

           आंबा व मिलेट्स महोत्सवाच्या उद्घाटनाला विभागीय आयुक्त संजय पवार, उपायुक्त श्री. म्हस्के, विभागीय  सहसंचालक किसन मुळे, विभागीय सह निबंधक देवयानी भारसवाडकर, पणन मंडळ उपसरव्यवस्थापक दिनेश डागा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक मयुरी मिसाळ व निलेश वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन गौरव काटकर यांनी केले.

                                                                        0000

निवृत्ती वेतनधारकांनी फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी; जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन

 

निवृत्ती वेतनधारकांनी फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी;

जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन

 

        अमरावती, दि. 24 (जिमाका): अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अधिनस्त सर्व निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी फसव्या फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी केले आहे.

           

           जिल्हा कोषागार कार्यालयाकडून निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर सर्व लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसूली किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रक्कमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधाला जात नाही. किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सुचित केले जात नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो. याबाबत काही निवृत्तीवेतन धारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात असून याबाबतच्या कोषागार कार्यालयास तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

 

            निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी फसव्या फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी. अशा प्रकारच्या फसव्या ऑनलाईन, गुगल पे, फोन पे, किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे भरण्याबाबत दुरध्वनी, भ्रमणध्वनीवरुन आलेल्या कॉल्स किंवा संदेशाला प्रतिसाद देवू नये. याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्ती वेतनधारकांची वैयक्तिक जाबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी. कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमत: कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

                                                         00000

Wednesday, May 22, 2024

अचलपूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश देणे सुरू

 

अचलपूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश देणे सुरू

 

        अमरावती, दि. 22 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अचलपूर तालुक्यातील मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात आठवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरीता अर्ज सादर करावा, असे आवाहन मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

 

            वसतीगृहात प्रवेशाबाबत प्रवर्ग निहाय जागा आरक्षित करण्यात आले असून ते खालील प्रमाणे आहेत.अनुसूचित जातीकरीता 80 टक्के, अनुसूचित जमाती 3 टक्के, वि.मा.प्र. 2 टक्के, इतर मागासवर्गीय 5 टक्के, वि.जा.भ.ज. 5 टक्के, दिव्यांगासाठी 3 टक्के व अनाथासाठी 2 टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. 

 

           वसतीगृहामध्ये ग्रंथालय, स्वतंत्र वाचन कक्ष, मोफत भोजन व निवास, विविध खेळ साहित्य, व्यायामाकरीता पोषक वातावरण, अध्ययन व अध्यापनाकरीता शैक्षणिक सुविधा, स्पर्धापरीक्षांचे योग्य मार्गदर्शन व शिबीर आयोजन करण्यात येतात. वर्ग आठवी, अकरावी व प्रथम वर्षासाठी रिक्त जागेनुसार दहावी ते बारावीच्या निकालानंतर प्रवेश अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र. 7720823124, 9604308256, 8605631680 क्रमांकावर संपर्क साधावा.

 

      प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रे : मागील वर्षाची गुणपत्रिका प्रत, पालकांची उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र , आधार, रहीवासी दाखला, बँक पासबुक झेरॉक्स(एसबीआय), शाळा सोडल्याचा दाखला प्रत, दारीद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, बोनाफाईट, नजिकच्या सरकारी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वास्थ प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, गॅप सर्टीफीकेट असल्यास पालकांचे हमीपत्र करारनामा.

0000

अचलपूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेत प्रवेश सुरू

 

अचलपूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेत प्रवेश सुरू

 

        अमरावती, दि. 22 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातंर्गत अचलपूर तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा, बुरघाट येथे सहावी ते दहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशाकरीता इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश करावा, असे आवाहन अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले आहे.

 

            निवासी शाळेत मुलांना निवास, सुसज्य अद्यावत क्लास रूम, ग्रंथालय सुविधा, ई-लायब्ररी, भोजन, पाठ्यपुस्तके, आठवी शिष्यवृत्ती परिक्षा तयारी, वैयक्तिक विकासावर भर, विज्ञान केंद्र व शारिरीक शिक्षण, प्रशस्त क्रीडांगण, खेळाचे मार्गदर्शन व गणवेश अशा प्रकारच्या सुविधा मोफत उपलब्ध आहे. तसेच  विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी निवासी शाळेमध्ये वेळोवेळी विविध उपक्रमाचे आयोजन केले जातात.  

 

             प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रे : मागील वर्षाची गुणपत्रिका प्रत, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहीवासी दाखला, बँक पासबुक झेरॉक्स(एसबीआय), शाळा सोडल्याचा दाखला, दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र, बोनाफाईट, नजिकच्या सरकारी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे स्वास्थ  प्रमाणपत्र, पासपोर्टसाईज फोटो, गॅप सर्टीफीकेट असल्यास पालकांचे हमीपत्र, करारनामा.

 

              निवासी शाळेत प्रवेशाबाबत प्रवर्ग निहाय जागा आरक्षित करण्यात आले असून ते खालील प्रमाणे आहेत. अनुसूचित जाती मुलांकरिता 80 टक्के जागा, अनुसूचित जमाती मुलांकरिता 10 टक्के, विमाप्रकरीता 2 टक्के, विजाभज मुलांकरिता 5 टक्के, दिव्यांग मुलांकरिता 3 टक्के जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. आरक्षणानुसार सहावा वर्गासाठी 40 जागा, सातवीसाठी 1, आठवीसाठी 2 तर वर्ग दहावीसाठी 1 जागा रिक्त आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र. 7720823124, 7020635557, 8788765371 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

मतमोजणीची कामे अधिक जबाबदारीने व अचुकपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी सौरभ कटियार मतमोजणी पूर्व नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

 






मतमोजणीची कामे अधिक जबाबदारीने व अचुकपणे पार पाडावी                                                      -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

मतमोजणी पूर्व नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

 

        अमरावती,दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक  निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी हा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे मतमोजणीच्या कर्तव्यावर असलेल्या सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोपविलेली कामे अधिक जबाबदारीने व अचुकपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांना दिले.

 

          अमरावती लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 4 जूनला विद्यापीठ रोडवरील लोकशाही भवन येथे होणार आहे. त्यानुषंगाने मतमोजणी पूर्व नियोजनाबाबत आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी आज महसूल भवन येथे घेतला. त्यावेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह सहाही विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी व कार्यन्वयन यंत्रणांचे प्रमुख आदी यावेळी उपस्थित होते.

 

       4 जूनला सर्वसाधारण मोजणी व पोस्टल बेलॅटची मतमोजणी होणार आहे. पोस्टल मतपत्रिकेची मतमोजणी सर्वात अगोदर होणार असून त्यासाठी सहा टेबल असणार. एका हॉलमध्ये 18 टेबल याप्रमाणे सहा हॉलमध्ये 108 टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सरमिसळीकरण (रॅन्डमायझेशन) प्रक्रिया आज होईल. तर येत्या दोन-तीन दिवसांत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कंट्रोल युनिट, ईव्हीएम हातळण्याबाबत तसेच पोस्टल मतपत्रिका कशी उघडावी, मत कसे गणण्यात यावे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

          मतमोजणीसाठी करावयाची टेबलनिहाय रचना, संगणक व्यवस्था, माध्यम कक्ष, मतमोजणी केंद्रावरील प्रवेश व सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थेसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी, आपत्ती संबंधी नियंत्रण कक्ष, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करावयाची पूर्वतयारी, भोजन व्यवस्था, मतमोजणी प्रक्रियेतील गोपनियता, वीज पुरवठा, सीसीटीव्ही, पिण्याच्या पाण्याची सुविधा, फिरते शौचालय, वाहनांसाठी पार्कींग व्यवस्था, इंटरनेट सुविधा, मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठीचे ओळखपत्र या व अन्य महत्वाच्या बाबींसंदर्भात जिल्हाधिकारी श्री. कटियार सविस्तर आढावा घेतला.

 

0000

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत विविध उपक्रम

 

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत विविध उपक्रम

                  अमरावती, दि. 22 (जिमाका): तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण तरूणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. 31 मे रोजी जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

 

            दरवर्षी 31 मे जागतिक तंबाखू नकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करून तंबाखू सारख्या वाईट व्यसनापासून दुर करणे हे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. विविध उपक्रमातंर्गत शाळेतील मुलांना मार्गदर्शन कार्यशाळा, सोशल मीडिया, कोटपा 2003 कायद्याविषयी माहिती अशा विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या वर्षीचे जागतिक तंबाखू नकार दिवसाचे घोषवाक्य ‘तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे सरंक्षण’ हे आहे.

           

           तंबाखूचे उत्पादन आणि सेवन यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक असून तोंडाच्या कॅन्सरसाठी पहिला क्रंमाक लागतो. 63 टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजार जसे की उच्चरक्तदाब मधुमेह, कर्करोग, (तोंडाचा, स्तनचा, गर्भाशय मुखाचा) पक्षाघात, फुफ्फुसाचे आजारामुळे होतात. यासाठी काही घटक कारणीभूत आहेत. असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, मद्याचे अतिप्रमाणात सेवन,  तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन आणि ताणतनाव या घटकांना आटोक्यात ठेवल्यास मृत्यूच्या प्रमाण टाळू शकतो.

 

कोटपा 2023 कायद्यातील विविध कमलानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहिराती करण्यास, 18 वर्षातील मुलांना तंबाखू विकणे किंवा त्यांच्याकडून विक्री करणे तसेच शैक्षणिक संस्थेचा 100 मीटर परिसरात तंबाखू विकण्यास बंदी आहे. कलम 7 अंतर्गत तंबाखू जन्य पदार्थांच्या वेष्टनावर किंवा पाकिटावर चित्रमय धोक्याची सूचना देणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या दि. 10 जुलै 2023 च्या शासननिर्णय नुसार सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, सुध्दा तंबाखू मुक्त ठेवण्याचे निर्देश आहे. शासकीय परिसरात तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे, बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. अशा वाईट व्यसनापासून तरूणांना वाचविण्यासाठी सर्व शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था व नागरीकांनी पुढाकार घेऊन तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहून आपल्या परिवाराला निरोगी ठेवा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

Tuesday, May 21, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात हिंसाचारविरोधी दिनाची शपथ

 


जिल्हाधिकारी कार्यालयात हिंसाचारविरोधी दिनाची शपथ

 

            अमरावती, दि. 21 (जिमाका): दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ दिली. यावेळी तहसिलदार भाग्यश्री देशमुख, निलेश खटके तसेच अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.

                                                        0000

नांदगाव खंडेश्वर येथील मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रीया सुरू

 

नांदगाव खंडेश्वर येथील मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रीया सुरू

 

           अमरावती, दि. 21 (जिमाका): नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेत 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता सेमी इंग्लिश माध्यमाच्या सहावी ते दहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाले आहे. प्रवेशाकरीता इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश करावा, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक एल. झेड. सुरजुसे यांनी केले आहे.

           

            शासकीय निवासी शाळेत प्रवेशाकरीता अर्ज दि. 28 एप्रिल ते 26 जून 2024 या कालावधीत शासकीय निवासी शाळेत मोफत उपलब्ध असून शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. निवासी शाळेत मुलांना निवास, सुसज्य अद्यावत क्लास रूम, ग्रंथालय सुविधा, ई-लायब्ररी, भोजन, पाठ्यपुस्तके व गणवेश अशा प्रकारच्या सुविधा मोफत उपलब्ध असून उच्च विद्याविभुषित शिक्षकवर्ग आहे. तसेच  विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी निवासी शाळेमध्ये वेळोवेळी विविध उपक्रमाचे आयोजन केले जातात.    

       

         निवासी शाळेत प्रवेशाबाबत प्रवर्ग निहाय जागा आरक्षित करण्यात आले असून ते खालील प्रमाणे आहेत. अनुसूचित जाती मुलांकरिता 80 टक्के जागा, अनुसूचित जमाती मुलांकरिता 10 टक्के, विजाभजच्या मुलांकरिता 5 टक्के, मागास प्रवर्ग मुलांकरिता 2 टक्के, दिव्यांगण व अनाथ मुलांकरिता 3 टक्के याप्रमाणे जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. प्रवेश संदर्भातील माहितीसाठी मुख्याध्यापक एल. झेङ सुरजुसे यांचा भ्रमणध्वनी क्र. 8888958239 वर संपर्क साधावा.

                                                      0000

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न; प्रलंबित प्रकरणाचा जलद निपटारा करा- अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे

 


जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न;

प्रलंबित प्रकरणाचा जलद निपटारा करा- अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे

 

           अमरावती, दि. 21 (जिमाका) : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज संपन्न झाली. यावेळी शहरी व ग्रामीण विभागात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातंर्गत घडलेले गुन्हे तसेच प्रलंबित गुन्ह्यांबाबत चर्चा करण्यात आली.

 

           अपर जिल्हाधिकारी श्री. वाघमारे यांनी प्रलंबित प्रकरणांचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषारोप न्यायालयात दाखल करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. तसेच निधी अभावी प्रलंबित प्रकरणांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार, अमरावती शहर गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक राहुल आठवले, ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक  सतिश पाटील, सहायक पोलिस अधिक्षक के.पी. सुलभेवार, शासकीय अभियोक्ता रश्मी भागवत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

          दक्षता समितीच्या बैठकीमध्ये माहे एप्रिल 2024 पर्यंतच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. तसेच माहे एप्रिलमध्ये एकुण अनुसूचित जाती व जमातीचे शहर विभागात  6 तर ग्रामिण विभागात 6  प्रकरणे दाखल झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. न्यायालयात प्रलंबित प्रकरणे, अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणाचा आढावा  यावेळी घेण्यात आला.

                                                      000000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...