पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी जलपुनर्भरणाचा यशस्वी प्रयोग घरोघरी जलपुनर्भरण व्हावे - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील










अमरावती, दि. 30 : पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी स्वत:च्या निवासस्थानी केलेला ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा प्रयोग यशस्वी झाला असून, केवळ 22 फूट खोलीवर मुबलक पाणी लागले आहे. या प्रयोगाचा खर्च अत्यंत कमी असून, जिल्ह्यातही घरोघरी जलपुनर्भरण व्हावे, असा संदेश पालकमंत्र्यांनी यानिमित्ताने दिला आहे.
याबाबत बोलताना श्री. पोटे पाटील म्हणाले की, पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे लाभदायी ठरते. मी माझ्या अमरावतीतील निवासस्थानी छतावर पडणा-या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी प्रयोग केला. गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक शोषखड्डे करून मी पावसाचे पाणी जमिनीत मुरवत होतो. त्यामुळे केवळ 22 फूट खोल अंतरावर ट्यूबवेलला मुबलक पाणी लागले. आता हाच प्रयोग प्लास्टिक ड्रम, पाईप, खड्डा याद्वारे शास्त्रोक्त पद्धतीनेही केला. त्याला केवळ सोळाशे रूपये खर्च येतो. या प्रयोगामुळे पाण्याचे पुनर्भरण वेगाने आणि खोलवर होते आणि मोठा जलसंचय होतो.
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याच्या विषयात महत्वाचे कार्य केले आहे. शिवारानंतर आता आपण घरोघरी पाण्याचे पुनर्भरण करून आत्मनिर्भर होऊया, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.  
            अत्यंत कमी खर्चाची आणि भविष्यासाठी महत्वाची ही बाब आहे. बाथरुम, बेसिन, किचनचे पाणी शोषखड्ड्यात सोडल्यास पुनर्भरणासाठी फायदेशीर ठरते. योग्य प्रकारे जलपुनर्भरण केल्यास पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते.  जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी वर खेचण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण होते. पाण्याचा दर्जा सुधारतो.  टंचाईसारख्या प्रश्नांवर मात करण्यासाठी प्रत्येक घरी जलपुनर्भरणाची गरज असून, नागरिकांनीही या प्रयोगाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनानेही केले आहे.  जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनीही विविध नगरपालिकांच्या बैठकीत या प्रयोगाबाबत माहिती देऊन असे विविध शहरे, गावांत जलपुनर्भरणाबाबत जागृती व प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती