आमदार व लोकप्रतिनिधींनी दुष्काळाबाबत आढावा घेण्याच्या दृष्टीने दौरे करावे - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील



अमरावती, दि. 3 : राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सर्व मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागात दौरे करण्याबाबत निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील हे जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेटी देत आहेत. जिल्ह्यातील आमदार व लोकप्रतिनिधींनीही आपल्या क्षेत्रात दुष्काळासंदर्भात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटी द्याव्यात, असे पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी सर्व आमदारांना कळविले आहे.
            जिल्ह्यात काही भागात पाणीटंचाई व चाराटंचाई निर्माण झालेली आहे. त्यानुषंगाने सर्व आमदारांनी आपल्या क्षेत्रात दौरे करून आढावा घ्यावा. याबाबत लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा व तालुकास्तरीय अधिका-यांची बैठक घेऊन आधीच उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले होते. उन्हाळ्यात दुष्काळाच्या अनुषंगाने आवश्यक तिथे तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ज्या ठिकाणी विहिरी अधिग्रहित करणे आवश्यक असेल, तेथे विहिरी अधिग्रहित करुन अधिग्रहित विहिरींचा तत्काळ मोबदला अदा करण्याबाबत व आवश्यकतेनुसार टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दुष्काळाबाबत आढावा बैठक घेण्यास अद्याप निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली नाही. तथापि, मान्यतेनंतर ती तत्काळ घेतली जाईल. त्यामुळे सर्व आमदार व लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रात दौरे करून शेतकरी, शेतमजूर व नागरिकांशी चर्चा करून दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती घ्यावी आणि पाणीटंचाई, चाराटंचाई यासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाला कळवावे जेणेकरून तत्काळ उपाययोजना अंमलात आणण्यात येईल, असे पालकमंत्र्यांकडून कळविण्यात आले आहे.
दुष्काळासंबंधी विविध शासकीय योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होऊन त्या लोकांपर्यंत पोहोचतात की नाही, याबाबत माहिती घेण्यात यावी व आता दुष्काळ दौ-यादरम्यान लोकांनी मांडलेल्या अडचणींच्या अनुषंगाने संबंधित अधिका-यांना कार्यवाही करण्याबाबत सूचित करावे, असेही पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींना कळविले आहे.
दुष्काळाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्याबाबत निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर सर्व आमदार व लोकप्रतिनिधींसमवेत सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती