खड्डे निर्मितीची कामे 15 मेपर्यंत पूर्ण करा - विभागीय आयुक्त पियूष सिंह

33 कोटी वृक्षलागवड अभियान


*वृक्ष लागवडीच्या नोंदीसाठी वनविभागाचे पोर्टल कार्यान्वित
www.mahaforest.gov.in वन विभागाचे पोर्टल
अमरावती, दि. 30 :    33 कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत वृक्ष लागवडीकरीता जागेची सुनिश्चिती, खड्डे खोदून जीओ टॅगींग, उद्दिष्टानुसार वृक्ष लागवडीचे नियोजन आदी कामे दिनांक 15 मेपर्यंत पूर्ण करावी, याबाबतची दैनंदिन अद्ययावत माहिती वनविभागाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदवावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पियूष यांनी आज दिले.
33 कोटी वृक्षलागवड अभियान अंतर्गत वृक्ष लागवडीसंबंधी जिल्हानिहाय आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक प्रदीप चव्हाण, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, मनपा आयुक्त संजय निपाणे यांचेसह इतर खात्याचे विभाग प्रमुख, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. सिंह म्हणाले की, राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ठ पूर्ण करण्याच्या अनुषंगाने अमरावती विभागाला एकूण 4 कोटी 36 लाख 58 हजार 800 एवढे लक्षांक असून त्याअनुषंगाने विविध शासकीय यंत्रणांनी वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. यापैकी सुमारे 1 कोटी 96 लाख 50 हजार 252 खड्डे निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विभागाचे खड्डे निर्मितीबाबतचे उर्वरित उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी प्रथमत: जागेची सुनिश्चिती करण्यात यावी. सुनिश्चित केलेल्या जागेवर वृक्ष लागवडीचे सुरळीत नियोजन करावे. दिलेल्या लक्षांकानुसार वृक्ष लागवड करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत दि. 15 मेपर्यंत खड्डे खोदून जीओ टॅगींग करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. वरील सर्व बाबींची माहिती वनविभागाच्या अधिकृत पोर्टलवर (www.mahaforest.gov.in) दैनंदिन अद्ययावत करावी. 
आतापर्यंत वृक्ष लागवडीसाठी विविध शासकीय विभागाव्दारे 40 लाख 28 हजार खड्डे, वनविभागाव्दारे 70 लाख 42 हजार 782 खड्डे, सामाजिक वनीकरण विभाग 72 लाख 80 हजार खड्डे तर स्वयंसेवी संस्था व इतर यंत्रणाव्दारे 12 लाख 98 हजार 772 असे एकूण 1 कोटी 96 लाख 50 हजार 252 खड्डे खोदून झाल्याचे चर्चेअंती वनविभागाने बैठकीत माहिती दिली.
विभागात मोठे, मध्यम, लघु धरण व तलावांच्या जलाशयाला लागून 125 हेक्टर क्षेत्रावर बॅक वाटरचे क्षेत्र आहे. दुष्काळग्रस्त भागात चारा टंचाईवर मात करण्यासाठी सिंचन प्रकल्पांच्या बॅक वॉटर क्षेत्रात चारा छावणी निर्माण करण्यात यावी. रस्त्यांच्या व कॅनलच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने जागेची सुनिश्चिती करावी. विभागात आतापर्यंत 81 हजार 220 सदस्यांची हरित सेना नोंदणी झाली आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, अशा सूचना श्री. सिंह यांनी यावेळी दिल्या.
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अमरावती विभागातील विविध रोपवाटीकामध्ये सुमारे 4 कोटी 30 लाख 13 हजार दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रोपांची उपलब्ध आहे. तसेच यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत जिल्हा परिषदेव्दारे सुमारे 1 लाख 96 हजार 173 लाभार्थी जन्मवृक्ष, शुभमंगल वृक्ष, आनंदवृक्ष व स्मृतीवृक्ष निवडण्यात आले असल्याची माहिती वनविभागाने दिली. या रोपांचे लाभार्थ्यांना जिल्हानिहाय वितरण करून त्यांच्याकडून वृक्ष लागवड होणार आहे. वरिल उपक्रमांतर्गत महानगरपालिकेव्दारे 17 हजार 428 वृक्ष तर नगरपालीकाव्दारे 6 हजार 594 लाभार्थ्यांकडून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.  कन्या वनसमृध्दी अंतर्गत 90 हजार 500 लाभार्थ्यांकडून वृक्ष लागवड होणार आहे.

वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत सन 2016 लागवड केलेल्या वृक्षांपैकी 63 टक्के वृक्ष जिवंत आहेत. सन 2017 मध्ये 70 टक्के वृक्ष जिवंत आहे तर 2018 यावर्षी 88 टक्के वृक्ष जिवंत असल्याच्या नोंदी वन विभागाचे डिजिटल प्लॅटफार्मवर आहे. यावर्षी सुध्दा प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करुन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करुन जिवंत वृक्षांचे प्रमाण वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे आवाहनही श्री. सिंह यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती