उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा तपशिल सादर करावा - निवडणूक खर्च निरीक्षक बसंत गढवाल



निवडणूक खर्च निरीक्षंकानी घेतला उमेदवारांच्या खर्चाचा आढावा

अमरावती, दि. 3 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कालावधीत होणाऱ्या प्रत्येक खर्चाचा तपशील देणे उमेदवारांना बंधनकारक आहे. उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा तपशील पुराव्यानिशी (पावती) निवडणूक खर्च कक्षाला नियमित सादर करावा, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक बसंत गढवाल यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबत आढावा श्री. गढवाल यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल, निवडणूक खर्च नोडल अधिकारी रविंद्रकुमार लिंगनवाड तसेच उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
श्री. गढवाल म्हणाले की, ज्या उमेदवारांनी अद्यापपर्यंत बँक खात्याची माहिती खर्च निरीक्षक कक्षाला सादर केलेली नाही त्यांनी तातडीने बँक खात्याची माहिती सादर करावी. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना प्रशासनाकडून पिवळे, गुलाबी व पांढऱ्या रंगाचे खर्च नोंदीचे रजिस्टर वितरीत करण्यात आले आहे. या रजिस्टरमध्ये दैनंदिन खर्च नोंदवून त्याच्या पावत्या निवडणूक खर्च कक्षाला सादर करणे अनिवार्य आहे. उमेदवाराला फक्त 10 हजार रुपये हातची रोकड म्हणून बाळगता येईल. निवडणूक खर्च तपासणी पथकाव्दारे उमेदवारांच्या दैनंदिन खर्चासंदर्भात खर्च निरीक्षकांना अहवाल सादर केला जातो. त्यासंदर्भातील नोंदी सत्यापीत करण्यासाठी उमेदवारांनी दैनंदिन खर्च बाबत आवश्यक दस्ताऐवज कक्षाला सादर करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. नवाल म्हणाले की, उमेदवारांनी सी-3 फॉर्म नुसार तीनवेळा इलेक्टॉनिक्स व प्रिंन्ट मिडियामध्ये गुन्ह्यासंदर्भात प्रसिध्दी देणे आवश्यक आहे व त्याचे पुरावे निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करावे. प्रचार साहित्य प्रमाणित करुन घेण्यासाठी पॉम्पलेटस्, पोस्टर, भित्तीपत्रके, फॅ्लेक्स इ. प्रचार सहित्यावर  मुद्रणालयाचे नाव स्पष्टपणे नोंदविण्यात यावे व त्यासोबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. प्रत्येक उमेदवाराने बँक खात्याचे विवरण सादर करणे बंधनकारक आहे. तसेच सर्व आर्थिक व्यवहार हे बँक खात्यामार्फतच व धनादेशाव्दारे करण्यात यावे, अशा सूचना श्री. नवाल यांनी बैठकीत दिल्या.
 आज आयोजित बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी दिनांक  10 एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहावे, तसेच दैनंदिन खर्चाचा तपशील निवडणूक खर्च कक्षाला नियमित सादर करण्यात यावा, असेही निवडणूक खर्च कक्षाव्दारे उपस्थितांना सूचित करण्यात आले.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती