क्रीडा संकुलात लोकशाहीचा जागर लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करा - केंद्रिय निवडणूक निरीक्षक दिनेशकुमार यांचे आवाहन


‘स्वीप’ला मिळाले उत्स्फूर्त लोकसहभागाचे बळ








क्रीडा संकुलात लोकशाहीचा जागर

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करा
            - केंद्रिय निवडणूक निरीक्षक दिनेशकुमार यांचे आवाहन
·         विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिकांची उपस्थिती
·         अनेक लक्षवेधी उपक्रम
·         मानवी साखळीतून संदेश

अमरावती, दि. 8 : संकल्‍प मतदानाचा, गुढी मतदानाची……सक्षम बनवू लोकशाही भारताची’... अशी साद मतदारांना घालत मतदार जनजागृती मोहिमेत आज विभागीय क्रीडा संकुलात लोकशाहीचा जागर करण्यात आला. उत्स्फूर्त लोकसहभागाचे बळ मिळालेल्या या भव्य कार्यक्रमात शेकडो मतदारांनी मतदान करून राष्ट्राप्रती कर्तव्यनिष्ठेची शपथ घेतली.
लोकशाही मजबुत करण्यासाठी मतदानाच्या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी सहभागा घेऊन मतदान हक्क बजावावा, असे आवाहन केंद्रिय निवडणूक निरीक्षक दिनेशकुमार यांनी यावेळी केले. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, स्वीपच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, मनपा आयुक्त संजय निपाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक आनंद भंडारी,सहा. आयुक्त श्रीमती मंगला मून, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती निलिमा टाके, सहायक प्रकल्प अधिकारी चेतन जाधव यांचेसह पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संघटना, दिव्यांग शाळेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी आदी यावेळी उपस्थित होते.
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मतदान जागृती गुढी उभारून कार्यक्रमाचा आरंभ झाला.  जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य प्राप्त खेळाडूव्दारे चुनावी ज्योत प्रज्ज्वलित करण्यात  आली. कार्यक्रमस्थळी मतदारांच्या जागृतीसाठी रांगोळी स्‍पर्धेतून संदेश, मानवी साखळी, चुनाव भिंत रंगविणे स्‍पर्धा, सेल्‍फी बुथ, दिव्यांग मतदारांसाठी ब्रेल लिपीतून प्रात्यक्षिक, साईन बोर्डवर स्वाक्षरी, मतदान जनजागृती स्टिकर लावणे तसेच व्‍हीव्‍हीपॅटचे प्रात्‍यक्षिक आदी उपक्रम यावेळी घेण्यात आले.
श्री. सिंह म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतदारांसाठी मतदान केंद्रांवर सतरा सुविधांचे उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदारांच्या जनजागृतीसाठी तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यात आली आहे. यावेळी देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करण्यासाठी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे  व परिसरातील लोकांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कर्तव्यनिष्ठा जपून निर्भयपणे मतदान करण्याची शपथही यावेळी सर्वांनी घेतली.
 संकल्‍प मतदानाचा, गुढी मतदानाचीया कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदान जागृतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. आपले व पर्यायाने समाज व देशाचे भवितव्य घडविण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करणे आवश्यक आहे. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकानी मतदान करुन आपला हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी केले.

यावेळी ‘जागर मतदानाचे’ या संकल्पनेवर आधारित इन्डो-पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यातर्फे गीत, नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांतर्फे पोवाडा, विद्यापीठाच्या चमूव्दारे पथनाट्य, दिव्यांग मतदारांसाठी ब्रेल लिपी व ऑडिओ क्लीपव्दारे संदेश प्रसारण, ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
   शिक्षीका दिपाली बाभूळकर यांनी ‘दुनिया बोलक्या बाहुल्यांची’ हा सुंदर कार्यक्रम सादर करुन उपस्थितांचे मनोरंजनासह प्रबोधनही केले. मतदान कर्तव्याचा संदेश देणा-या  मानवी साखळीचे दृश्य खिळवून ठेवणारे ठरले.   
कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, पंचायत समिती कर्मचारी, आशा वर्कर, जिल्हा परिषदेचे शिक्षकवृंद, मनपा कर्मचारी, स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी व अन्य प्रशासकीय यंत्रणांचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या नागरिकांची संख्या मोठी होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे, दिलीप मानकर, सहायक समाजकल्याण आयुक्त सुनील वारे आदी उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती