अमरावती, दि. 30 : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत मतमोजणी नेमाणी गोडाऊन येथे दि. 23 मे रोजी होणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, चोख बंदोबस्त आदी काटेकोर ठेवावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
मतमोजणी संदर्भात पूर्वतयारी आढावा सभा जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. स्वीपच्या नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, उप निवडणूक निर्णय अधिकारी उदय राजपूत, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, मनोहर कडू, स्नेहल कनिचे, शिरीष नाईक, अनिल टाकसाळे, खर्च सनियंत्रण पथकाचे रवींद्रकुमार लिंगनवाड, आचारसंहिता कक्षाचे संदीप जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके यांच्यासह सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, मतमोजणीचे काम लक्षात घेऊन सुसज्ज यंत्रणा मतमोजणी केंद्रावर उपलब्ध असावी. या सर्वांना प्रशिक्षण देण्यात येईल. मोजणी अधिकारी, सहायक, संगणक सहायक आदी सर्व मनुष्यबळाला आवश्यक प्रशिक्षण व सूचना देण्यात याव्यात. या संपूर्ण प्रक्रियेत उप निवडणूक निर्णय अधिका-यांसह सर्वांनी परस्पर समन्वय ठेवावा.
पुरेशी सुरक्षा यंत्रणा, लेखनसामग्री, आवश्यक वाहनांची तजवीज ठेवावी. मनुष्यबळासाठी भोजन, पेयजल आदी सुविधा असाव्यात. ज्या कर्मचा-यांना आदल्या दिवशी हजर व्हावयाचे आहे, त्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात. त्यांच्या मुक्कामाची सुविधा ठेवावी. या प्रक्रियेच्या कोणत्याही कामात कसूर ठेवू नये, असेही ते म्हणाले.
टपाली मतपत्रिका, कम्युनिकेशन सेंटर, मीडिया सेंटर आदींबाबत काटेकोर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.
No comments:
Post a Comment