जिल्ह्यात भीमजयंती उत्साहात साजरी



     


बाबासाहेबांच्या विचारांचा वसा जपूया, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया
-          जिल्हा निवडणूक प्रशासनाचे आवाहन
अमरावती, दि. 14 : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रौढ मताधिकाराचे कट्टर समर्थक होते. त्यामुळे भारतीय संविधानात एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हे तत्व समाविष्ट होऊन देशातील प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार मिळाला. बाबासाहेबांच्या विचारांचा हा वसा जपूया व आपणही मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया, असे आवाहन आज भीमजयंतीनिमित्त जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्ह्यातील मतदारांना केले आहे.
            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात आज सर्वत्र प्रशासन, विविध विभाग व कार्यालये, शाळा- महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटना, समित्या यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहरातील इर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. काल सायंकाळपासूनच या परिसरात नागरिकांनी भेट द्यायला सुरुवात केली. परिसरात काल सायंकाळी भीमगीतांचा अप्रतिम कार्यक्रम सादर करण्यात आला.  त्यालाही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
            जिल्ह्यातून, तसेच शहरातून आज सकाळीच आबालवृद्ध, महिला, युवक, युवतींचे जत्थे या परिसरात दाखल झाले.  शिक्षण, संघटन व संघर्षाचा संदेश कृतीत उतरवणा-या महामानवाच्या जीवन, कार्य व विचारांना मानवंदना देण्यासाठी आपल्या कुटुंबियांसह नागरिक जमले होते. उन्हातान्हाची पर्वा न करता मोठ्या उत्साहात नागरिक येत होते. कुणी रॅली घेऊन आले, कुणी गाणी म्हणत आले, कुणी घोषणा देत आले. महामानवाच्या जयघोषाने आसमंत निनादून गेले होते.
परिसरात बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तके, त्यांच्यावर विविध लेखकांनी लिहिलेली पुस्तके, विचारवंतांची पुस्तके उपलब्ध करून देणारी अनेक दुकाने मांडण्यात आली होती. समतेच्या विचारांच्या आजच्या उत्सवानिमित्त नागरिकांनी पुस्तकांची मोठी खरेदी केली.  येणा-या नागरिकांसाठी संस्था- संघटनांकडून पेयजल, खाद्यपदार्थांची सुविधा पुरविण्यात आली. एकता रॅली आयोजन समितीच्या वतीने दिवसभर सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीतर्फे अभिवादन कार्यक्रम झाला.
            जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आदर्श आचारसंहिता कक्षाचे प्रमुख संदीप जाधव, नायब तहसीलदार नीता लबडे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. जिल्हा माहिती कार्यालयात हर्षवर्धन पवार, विजय राऊत, सागर राणे, योगेश गावंडे, सुरेश राणे, सविता बारस्कर, गजानन परटके, राजश्री चोरपगार यांनी अभिवादन केले. स्वीप मोहिमेतही बाबासाहेबांचे लोकशाही निवडणूक प्रक्रियाविषयक संदेश प्रसारित करण्यात आले.
            ‘मतदानाचा अधिकार केवळ साक्षरांपुरता मर्यादित असू नये. तो या देशातील प्रत्येक व्यक्तीला असावा. मताधिकार हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार असावा’, असे स्पष्ट मत बाबासाहेबांनी मांडले होते. जर कायद्याचे पालन करण्याचे बंधन प्रत्येक नागरिकावर आहे, तर शासनकर्ते निवडण्याचा अधिकारही प्रत्येकाला असावा, अशी भूमिका बाबासाहेबांनी मांडली. त्यानुसार भारतीय संविधानात एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य हे तत्व समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे मतदारांनीही  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करून बाबासाहेबांच्या विचारांचा वसा जोपासावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले.
                                    000     

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती