मतदान जागृतीरथाला जिल्ह्यात ‘फ्लॅगऑफ’ जिल्हाधिका-यांकडून मतदान जागृतीरथाला हिरवी झेंडी






      
·        नागरिकांकडूनही रथाचे उत्स्फूर्त स्वागत
·        लोकराज्य’च्या निवडणूक विशेषांकाचेही प्रकाशन  
अमरावती, दि. 10 : निवडणूक प्रक्रियेत मतदार जनजागृतीसाठी भारतीय रेल्वेच्या मतदान जागृती रथाचे (हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस) बडनेरा स्थानकावर काल मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वागत केले. ‘लोकराज्य’च्या निवडणूक विशेषांकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
हावडा ते अहमदाबाद असा दोन हजार 87 कि. मी. चा आणि 37 तास 35 मिनीटांचा प्रवास करणारा हा मतदान जागृती रथ काल साडेदहा वाजताच्या सुमारास बडनेरा स्थानकात दाखल झाला. मतदान जागृतीच्या विविध संदेशांनी रथाचे डबे सुशोभित करण्यात आले होते. प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी मतदान जागृतीरथाचे चालक  यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्री. नवाल यांनी रेल्वेतून प्रवास करणा-या प्रवाश्यांशी हितगुज करत त्यांना मतदान करुन राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थित कलापथकाकडून मतदान संदेश देणा-या बहारदार नाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला व गीतसंगीताने प्रवाश्यांचे स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या.  करमणूकीसह प्रबोधन घडविणारा कलापथकाचा प्रयोग उपस्थितांना खिळवून ठरला. या कार्यक्रमाला शहरातूनही नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.   जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी रथाला हिरवी झेंडी दाखवली. त्यानंतर रथ अकोल्याकडे मार्गस्थ झाला. यावेळी स्थानकावर व्हीव्हीपॅट व ईव्हीएम यंत्रणेच्या प्रात्यक्षिकातही नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी, रेल्वेचे  निसार सय्यद, पी. जी. पूर्जेकर, महापालिकेचे सहायक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, स्वीप मोहिमेचे अधिकारी ज्ञानेश्वर घाटे, वीरेंद्र गलफट, प्रवीण वासनिक, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते. स्थानकप्रमुख पूर्णेंदू सिन्हा यांनी सहकार्य केले.
प. बंगाल, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र व गुजरात सहा राज्यांतून प्रचार करणार आहे. त्यावर एकूण 64 थांबे आहेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक 26 थांबे आहेत. प्रत्येक ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून फ्लॅग ऑफ करण्यात येत आहे.   
                                    लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन
अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार हे लोकराज्यच्या निवडणूक विशेषांकाचे अतिथी संपादक आहेत. मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध गोष्टींची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे. हा अंक मतदारांसह उमेदवार, कार्यकर्ते, अधिकारी- कर्मचारी, अभ्यासक, पत्रकारांना उपयुक्त ठरेल, असे श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले. 
 महिला व तृतीयपंथीय मतदारांचा वाढता सहभाग,  मतदार जनजागृती, मतदान प्रक्रिया, निवडणूक अधिकारी-कर्मचा-यांचे प्रशिक्षण, पेड न्यूज, समाज माध्यमांबाबत निवडणूक काळात घ्यावयाची खबरदारी,निवडणुकांचे बदलते तंत्र, निवडणुकीतील परिवर्तन युग, निवडणूक खर्चावर नियंत्रण आदींबाबत लेखांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. या अंकाची किंमत 10 रुपये असून अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती