टंचाई निवारणासाठी प्रशासन सुसज्ज उपाययोजनांना गती द्यावी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे निर्देश



*19 गावांत टँकरने पाणीपुरवठा
*90 हून अधिक विहिरी अधिग्रहित

अमरावती, दि. 3 : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा व आवश्यक उपाययोजना तत्काळ अंमलात आणाव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित यंत्रणा व तहसील प्रशासनाला दिले आहेत.
जिल्ह्यात 19 गावांत 21 टँकरने पाणीपुरवठा होत असून, 91 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.  दुष्काळ निवारणासाठी प्राधान्याने कामे पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, यासाठी प्रशासनाने नियोजन केल्यानुसार सगळ्या तरतुदी अंमलात आणाव्या, असे निर्देश श्री. नवाल यांनी दिले आहेत. त्यानुसार 113 विंधनविहीरींचे कामे पूर्ण करण्यात आली आहेत. 67 कूपनलिकांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
जिल्हाधिका-यांनी नुकतीच  मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच इतर यंत्रणांची बैठक घेऊन टंचाई निवारणाबाबत निर्देश दिले.  त्याचप्रमाणे, चिखलदरा येथेही नवसंजीवनीच्या बैठकीसह त्यांनी टंचाई स्थिती व उपाययोजनांचा आढावा घेतला. सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी टंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कामे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
उन्हाळ्यात दुष्काळाच्या अनुषंगाने आवश्यक तिथे तत्काळ उपाययोजना करण्याबाबत निर्देशानुसार   कामे होत आहेत. आवश्यक तिथे विहीरी अधिग्रहित केल्या जात आहेत. तात्पुरत्या पूरक नळ योजनेचे 63  गावांचे प्रस्ताव मंजूर असून, नळ योजना विशेष दुरुस्तीचे 123 प्रस्ताव मंजूर आहेत. ही कामे पूर्णत्वास जात आहेत.
अमरावती तालुक्यातील बोडणा, परसोडा, मोर्शीतील वाघोली, आसोना, चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला वि., जळका जगताप, सालोरा खुर्द, अंजनगाव सुर्जीतील चिचोना, चिखलद-यातील मनभंग, आडनदी, भिलखेडा, कोसलारी, वाघडोंगरी, परमडोह, बहादूरपूर, सोलापूर, पिपाधरी, खिरपानी, खडीमान या गावांत टँकर सुरू आहेत.
अमरावती तालुक्यात 12, नांदगाव खंडेश्वरमध्ये 7, भातकुलीत 1, तिवस्यात 9, मोर्शी तालुक्यात 17, चांदूर रेल्वे तालुक्यात 23, धामणगावमध्ये 1, अचलपूरमध्ये 15, चिखलद-यात 5 व अंजनगावमध्ये एक विहिर अधिग्रहित आहेत.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध कामे सुरु आहेत. नागरिकांना किमान एक हजार दिवसाचा रोजगार मिळेल यापद्धतीने सर्व कामांचे नियोजन असून,मनरेगा योजने जास्तीत जास्त जलव्यवस्थापनाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.   
गाळ काढणे, नाला खोलीकरण, शेततळे, जलसाठा निर्मितीची कामे जून महिन्याअगोदर पूर्ण करण्याचे आदेश आहेत. जेणेकरुन पावसाळयात अधिक प्रमाणात जलपुनर्भरण शक्य होईल. सद्य:स्थितीत जिल्ह्यात विविध यंत्रणामार्फत अडीच हजारांवर कामे सुरु आहेत.  पाणीटंचाई, रोजगार हमी योजना आणि वृक्ष लागवड या विषयाशी निगडीत कामे तालुका अधिका-यांनीआपापसात समन्वय ठेवून पूर्ण करावी, असे निर्देश आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती